गावोगावच्या शाळांना राजकारणाचा अड्डा बनवू नये- आयकर आयुक्त भरत आंधळे

अकोले प्रतिनिधी
मोबाइलपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी मनापासून झटून वाचन आणि अभ्यास केला पाहिजे. शिक्षकांनी ध्येयवादी बनून विद्यार्थ्यांना ताकदीने शिक्षणाची शिदोरी दिली पाहिजे. कोणत्याही गावातील ग्रामस्थांनी बाहेर काय राजकारण करायचे ते करावे. ज्ञानाचे मंदिर असलेल्या शाळांना राजकारणाचा अड्डा बनवू नये, गावाने एकत्र येऊन शाळांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त, लेखक आणि प्रसिद्ध वक्ते भरत आंधळे यांनी केले.
वीरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ध्वजारोहण आंधळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
वीरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेस आयकर विभागाने पावणेदोन लक्ष रुपयांचा इंटरऍक्टिव्ह पॅनेल बोर्ड भेट दिला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन भरत आंधळे सर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाकचौरे, नगर जिल्ह्याचे आयकर विभागाचे प्रमुख प्रकाश हजारे , अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सरपंच प्रगती वाकचौरे, उपसरपंच जयवंत थोरात, विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मुळे, सेवा संस्थेचे अध्यक्ष सुनील वाकचौरे, पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठल कुमकर, खरेदी विक्री संघाचे बाबासाहेब वाकचौरे, मुख्याध्यापक शैला भोईर, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन ढगे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमाशंकर मालुंजकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आंधळे यांनी स्पर्धा परीक्षा आणि जीवन कौशल्ये यांची सांगड घालून शिक्षण देण्याची गरज अधोरेखित केली. मुलांपेक्षा मुली स्वतःला वेगवेगळ्या क्षेत्रात जास्त उत्तम प्रकारे सिद्ध करत असल्याचे निरीक्षण नोंदवले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी शाळेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत वेगवेगळ्या उपक्रमांचे कौतुक केले. भविष्यकाळात संस्कार, नितीमूल्ये यावर भर देणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले. आयकर विभागाने शाळेला भरीव मदत केल्याबद्दल गावाच्या वतीने आभार मानले.
स्वागत भास्कर आंबरे यांनी केले. भाऊसाहेब चासकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रावसाहेब सरोदे केले. विद्यार्थ्यांची भाषणे झाली. आभार कांचन वाकचौरे यांनी मानले. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर समूहनृत्य सादर केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याला दाद दिली. संभाजी वैद्य, रामनाथ वाकचौरे, सुरेश आरोटे, अनिता भालेराव, मीनल चासकर, श्रीराम धराडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.