परिवर्तनाच्या चळवळीत वंचित घटकांना आंबेडकरवाद्यांनीच जवळ केले – दिशा पिंकी शेख

अहमदनगर येथे दहावे रमाई चळवळीचे साहित्य संमेलन संपन्न संविधान रॅली, परिसंवाद, कविसंमेलन आणि विद्रोही शाहिरी जलसा असा दिवसभर भरगच्च कार्यक्रम
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
परिवर्तनाची लढत असतांना अनेकांनी इथल्या वंचित घटकांबद्दल, उपेक्षित घटकांबद्दल, हिजडा समूहाबद्दल केवळ संवेदना व्यक्त केल्या, केवळ भाषणं ठोकली परंतु त्यांना कुणीही जवळ केले नाही. परिवर्तनाच्या लढाईमध्ये वंचित घटकांना जवळ करण्याचे, न्याय देण्याचे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची संधी केवळ आंबेडकरवाद्यांनीच दिली, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री, नाट्यलेखिका, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा दहावे रमाई चळवळीचे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दिशा पिंकी शेख यांनी केले.
त्या आज शनिवारी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित दहावे रमाई चळवळीचे साहित्य संमेलनातून बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर संमेलनाच्या उद्घाटक प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्षा ललिता खडसे, संमेलनाच्या मुख्य संयोजक डॉ. रेखा मेश्राम, के. ई. हरिदास, नीलिमा बडेल्लू, प्रतीक बारसे, डॉ. अरुण जाधव, डॉ. रश्मी पाथरीकर, ऍड. सुभाष लांडे, स्मिता पानसरे, एकनाथ गायकवाड, राहुल कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी आंबेडकरी स्त्रीवाद : डॉ. रेखा मेश्राम, रमाई चळवळीचे साहित्य संमेलनांची अध्यक्षीय भाषणे : संपा. डॉ. रेखा मेश्राम, सामाजिक एकता : रत्नकला बनसोड या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना शेख म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही पारलिंगी समूह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि साहित्यिक मुख्य प्रवाहात येऊ शकलेला नाही, नव्हे तर त्याला येऊ दिले नाही. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आम्हाला जे काही अधिकार दिले त्याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. आंबेडकरी चळवळ आणि पारलिंगी समूहाचा संबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरू झाला. र. धो. कर्वे यांच्यावर पुण्यातील प्रस्तापितांनी समाजस्वास्थ या मासिकावरील उत्तरावरून दाखल केलेला खटला बाबासाहेबानी लढून पहिल्यांदा पारलिंगी समूहाच्या सोबत उभे राहण्याचे धाडस केले होते. आज राजकीयदृष्ट्या बाळासाहेब आंबेडकरांनी हिजडा समूहाचा जो सन्मान केला आहे ती हिंमत आणि धमक कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नाही. आज साहित्यिकदृष्ट्या रमाई संमेलनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतरही कायम उपेक्षित राहिलेल्या हिजडा समूहाला मुख्य साहित्यिक प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण काम डॉ. रेखा मेश्राम यांनी केले आहे, याबाबत आनंद आहे. सुरुवातीला सकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते संमेलनस्थळ पर्यंत संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना बुद्धवंदना दिल्यानंतर संमेलनाला रीतसर सुरुवात झाली.
प्रास्ताविकात बोलताना रमाई मासिकाच्या संपादक डॉ. रेखा मेश्राम म्हणाल्या की, अनेक विचारांची साहित्य संमेलने भरतांना आपल्याला दिसतात परंतु चळवळीचा विचार, भूमिका मांडणारे साहित्य संमेलने भरतांना दिसत नाहीत. एका पारलिंगी व्यक्तीला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा उठला परंतु आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहिलो. ही ताकद फुले-आंबेडकरी विचार चळवळीची आहे. दिशा पिंकी शेख यांच्या असण्याने हे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने वंचितांचे साहित्य संमेलन झाले आहे.
उद्घाटकीय भाषणात बोलतांना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी बोलतांना म्हणाल्या की, आजचे संमेलन विचारांचा जागर करणारे आहे. ज्या साहित्याने आमचे प्रश्न मांडले नाही, आमच्या व्यथा मांडल्या नाही त्या साहित्याला महात्मा फुलेंनी त्या काळात विरोध केला होता. परिस्थिती आजही बदलली नाही. आजही आपल्या साहित्यावर मौन पाडून त्याची दखल घेण्याचे प्रस्थापित साहित्यिकांचे मनसुबे ओळखून परिवर्तनाचा विचार मांडणारे आमचे स्वतःचे संमेलन आम्ही आज भरवत आहोत, आणि या साहित्य संमेलनातून निश्चितपणे परिवर्तनाची नवी दिशा आम्ही ठरवू, हा आमचा विश्वास आहे. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुशीला जाधव यांनी केले तर आभार दैवशीला गवंदे यांनी मानले. डॉ. सुरेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ‘वंचितांची दिशा’ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून धम्मसंगिनी रमा गोरख, प्रवीण कांबळे, प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले आदी उपस्थित होते. दुसरा परिसंवाद हा शमीभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘तृतीयपंथी आणि सामाजिक मानसिकता, हक्क आणि अधिकार’ या विषयावर संपन्न झाला. यामध्ये वक्ते म्हणून डॉ. संजय बोरुडे, ऍड. वैशाली डोळस, स्मिता पानसरे, लता जाधव आदी उपस्थित होते.
त्यानंतर प्रा. शर्मिला गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले. यात स्वाती ठूबे यांच्या सह अनेक कवयित्री सहभागी होत्या. विद्रोही सांस्कृतिक जलशाने संमेलनाची सांगता झाली. यावेळी दैवशीला गवंदे, कल्पना वाहूळे, शीला जाधव, शोभा खाडे, डॉ. प्रज्ञा साळवे, डॉ. विजया सिरसाट, डॉ. वंदना पाटील, बेबीनंदा पवार, सुवर्णा सिरसाट, शारदा गजभिये, शोभा गाडे, मंगल मुन, अनुमती तिडके, दीक्षा मेश्राम, डॉ. सुनंदा रामटेके, सरला सदावर्ते, रत्नकला बनसोड, गौतमी भिंगारदिवे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
घेण्यात आले ठराव
१) प्रत्येक तालुकास्तरावर दहा व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यात यावे.
२) महाकवी वामनदादा कर्डक यांची ग्रंथसंपदा शासनाने खंड स्वरूपात प्रसिद्ध करावे.
३) पारलिंगी समूहाला समांतर आरक्षण मिळावे
४) सर्व शासकीय कागदपत्रांवर Other चा कॉलम ऍड करण्यात यावा.
५) UPSC, MPSC आणि बार्टी संस्थेच्या सर्व योजनांमध्ये अर्ज करतांना other चा कॉलम ऍड करावा.
६) ट्रान्सजेंडर सुरक्षेबाबत आणि ट्रान्सजेंडर शैक्षणिक धोरण शासनाने तत्काळ जाहीर करावे.
७) पारलिंगी समुदयावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराची शिक्षा महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या बरोबरीत असायला हवी.
८) अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.
पुरस्कार – रमाई गौरव पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यामध्ये संगिता नंदकिशोर आढाऊ (जि.प. अध्यक्ष, अकोला), सुनिता भोसले (शिरूर), अनुराधा लोखंडे (उस्मानाबाद), प्रज्ञा भालेराव (संगमनेर), शर्मिला गोसावी (अहमदनगर), ज्योती तुकाराम पवार (रत्नागिरी), वसुंधरा श्रीमंधर मधाळे (कोल्हापूर), डॉ. लता जाधव (औरंगाबाद), पूनम महादेव गाडे (कुस्तीपटू, पाथर्डी), डॉ. रश्मी पाथ्रीकर (अहमदनगर), शमिभा पाटील (जळगाव), ज्योत्स्ना कांबळे (औरंगाबाद), नंदा गायकवाड (मनपा उपायुक्त,औ.बाद), अॅड. वैशाली डोळस (औरंगाबाद), डॉ. अर्चना गणवीर (औरंगाबाद), गौतमी भिंगारदिवे (अहमदनगर), शोभा मोहनराव गाडे (अहमदनगर), बेबीनंदा सुभाष लांडे (अहमदनगर), डॉ. क्षमा खोब्रागडे (औरंगाबाद), निलिमा बंडेल्लू (अहमदनगर) आदींचा समावेश होता.