देशातील पहिली महिला कुस्तीपटू ममताई अर्थात ममता पहिलवान!

अकोले प्रतिनिधी
देशातील पहिली महिला कुस्तीपटू ममताई अर्थात ममता पहिलवान हे पुस्तक जुन्नर येथील लेखक रणजित पवार यांनी ममताई यांचा जिवनवृत्तात गद्य आणि पद्य यांचा सुवर्णसंगम साधून अथक परिश्रमाने पूर्ण केले
या पुस्तकाचे मुखपृष्ठ सुंदर असे प्रदीप सूर्यवंशी यांनी आपल्या संकल्पनेतून ममताईचे रेखाटन वर्णनानुसार केले आहे मुखपृष्ठ पाहून नेमकं पुस्तकांमध्ये काय आहे हे वाचायची जिज्ञासा मुखपृष्ठातून समजते.मलपृष्ठावर पुणे येथील साहित्यिक रामचंद्र जोरवर यांचे प्रेरणादायी मनोगत लिहिले आहे. लेण्याद्री प्रकाशन ओतुर तालुका जुन्नर यांनी केले. मुद्रक शिवानी प्रिंटर्स पुणे, अक्षर जुळणी लक्ष्मी एंटरप्राइजेस पुणे, या पुस्तकाचे स्वागत मूल्य एकशे वीस रुपये असून पृष्ठ संख्या 108 पानांची आहे…. सोबतीला संकलित केलेले काही फ़ोटोज लेखकाच्या कार्याची ग्वाही देतात…
89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. श्रीपाल सबनीस साहेब यांनी या पुस्तकासाठी दोन शब्द मनोगत म्हणजे समुद्रातून मोती शोधण्यासमान आहे.. पूर्ण पुस्तकाचा सार या मनोगतातून समजतो… ब्रह्मचर्याचे पालन करून शाकाहार करणाऱ्या ममता पहिलवानाची कथा रोचक असून चरित्र नायिकेच्या ध्येयवादी भूमिकेवर प्रकाश टाकते असे आवर्जून सांगतात.लेखकांनी सिन्नर परिसरातून मिळवलेली माहिती सत्याला सुसंगत अशी दिसते. आजवर कलावंत, नेते लेखक इत्यादीचे लेखन झाले पण महिला पहिलवानाचे मराठीतील हे लेखन पहिलेच चरित्र ठरते याबद्दल ते लेखक मा. रणजित पवार यांचे अभिनंदन करतात… मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंत मा. श्रीपाल सबनीस यांनी या पुस्तकासाठी दिलखुलासपणे व्यक्त व्हावे म्हणजे सोने पे सुहागा पुस्तक, वाचकांसाठी लाख मोलाचे..
खरं तर हे पुस्तक वाचल्यावर मनात समीक्षण करण्याचा विचार आला…कारण हे आगळे वेगळे ऐतिहासिक जीवनपट.. त्याचबरोबर एका डोंगराळ भागात राहणाऱ्या दुर्लक्षित असलेल्या देशातील पहिल्या महिला कुस्तीपटू ..ममताई पहिलवान … अर्थातच यांना उजेडात आणण्याचे कार्य आणि प्रेरणा दिली ती मा.श्री विष्णू जोरवर आणि समशेरपूर येथील डॉ. हरिश बेणके यांनी लेखक रणजित पवार यांना ममताईबद्दल लिहिण्यास सांगितले त्यामुळे कानडी समाजातील एक पडद्याआड असलेले व्यक्तिमत्त्व आज समाजासमोर आणण्याचे काम जोरवर साहेब, डॉ. हरीश बेणके (समशेरपूर, अकोले) या दोन अवलियाच्या मदतीने लेखकांनी केले आहे…
ममताई पाटोळ्यातील डोंगरावर राहणाऱ्या खंडुजी पाटील यांची कन्या. 1जून 1894 डोंगराळ भागात पाटोळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हिरव्यागार वातावरणात हिंस्र प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी ममताईचा जन्म झाला. त्यांचा संपूर्ण प्रवास अतिशय खडतर, संघर्षमय, रोमांचक तसाच आश्चर्यकारक असून अंगावर शहारे आणणारा आहे. ममताई यांचा जीवन पट वाचताना अक्षरशः मन हेलावून गेले.कारण त्यांच्या कौटुंबिक व वैयक्तिक जीवनात अनेक वादळे आली त्यावर मात करत ध्येयप्राप्तीकडे हे ममताई आणि त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते . ममताई एक स्री पहिलवान स्री असो वा पुरुष मनुष्याचे मनोबल काय असतं हे ममताईने जगासमोर पट्टीचा पहिलवान बनून सिद्ध करून दाखवलं . स्री म्हणून जन्माला आलेली ममताई निसर्गाचे सर्व नियम झुगारून पुरुष बनली. स्त्रीत्वावर मात करून पुरुषी बाणा स्वीकारला. त्यांचे वडील खंडोजी पाटलांनी प्रतिकूल वातावरणात रूढी, परंपरा जुगारून, फाटा देवून लेकीला व्यायाम आणि कुस्ती शिकवली. पुरुषांची कुस्ती खेळणारी पहिली महिला म्हणून ममताचे कर्तृत्व आजच्या पिढीसाठी प्रेरक वाटते. ममताईचे पहिले गुरू त्यांचे वडीलच होते. आता कुस्तीत उतरायचे म्हणजे त्याकाळी पुरुष कुस्ती खेळत होते ममताई स्त्री असल्याने तिच्याशी कुस्ती कोण खेळणार म्हणून ममताला मुलगी बनून नव्हे तर मुलगा म्हणूनच कुस्त्या खेळायच्या होत्या सराव करताना आपण मुलगी आहोत असे स्वतःला कधीच वाटू दिले नाही एवढी खुमारी ठासून भरलेली होती. पुढे आपल्या छातीचा अडथळा होऊ नये म्हणून तिने दोन्ही बाजूस विटांनी मारा करायला सुरुवात केली. पुढे चालून ममताची छाती पाहून ती एका महिलेची आहे की पुरुषाची असा फरकही कोणी ओळखू शकत नव्हते. इतका संघर्षमय प्रवास म्हणतात ममताचे वागणे पूर्ण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने होते ती म्हणजे एक अजबच रसायन होते निसर्गाला आव्हान देणारी निडर व्यक्तिमत्व स्वतःला सिद्ध करण्याचा सामर्थ्य असणारी जगावेगळी महिला म्हणजे ममता सदगीर. जेव्हा चौदाव्या वर्षी त्यांना पहिल्यांदा पाळी आली त्याचे दुःख मनातून होतेच कारण मुलांप्रमाणे बोलणे राहणे वागणे काम करणे एवढेच काय कपडेसुद्धा मुलांप्रमाणे घालायची यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून वडील देखील साथ देत होते. देवाला साकडे घालून ममताने पाळीपासून मुक्तता मिळवली.कारण देवावर असलेली श्रद्धा आणि अद्भुत विश्वास. ममताईचे जेवण म्हणजे शुद्ध शाकाहारी याच्या जोरावर शरीरायष्टी कमावली जेव्हा जोर बैठका काढत असे तेव्हा त्यांनी जोर बैठकासाठी केलेला खड्डा घामाच्या थेंबान्नी भरत नाही तोपर्यंत अथक सराव सुरु ठेवायचा.ममताईचे बोलणे, वागणे, राहणे, शिव्या देणे हे सर्व पाहता त्यांचे वडील माझा हा दुसरा मुलगाच आहे असे अभिमानाने सांगायचे. जेव्हा ममताई मैदानात उतरायची तेव्हा फक्त्त अंगावर लंगोट नेसायची. वस्ताऱ्याने डोकयावरचे केस काढायची.
ममताईमध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची मनापासून असलेली तयारी आत्मविश्वास… वडील सांगतील ती पूर्वदिशा अगदी तसेच ममता करत होती. त्यामुळे वडिलांच्या गळ्यातील ताईत होती ममता..खंडोजी पाटलांना नेहमी वाटायचे आपले दोन्ही मुलं पट्टीचे पहिलवान व्हावेत त्यांच्या स्वप्नांना आकार दयावा.. ममताचा सराव पाहून ते मनोमनी खुश व्हायचे. दादाला त्यांनी कोल्हापूरच्या तालमीत पाठवले. तालमीत तयार झालेला तगडा पहिलवान पाहून लोकं दचकायचे. परिसरात तसा चांगला दबदबा खंडोजी पाटलांचा होता. दोन्ही मुलं कुस्ती जिकूंन आले की, त्यांना फार आनंद होत असे.ममताईने वाघाशी झुंज दिली. रात्रीच्या किर्र जंगलातील अंधाऱ्या रात्री निडरपणे ममता रस्त्याने चालण्यास वेळप्रसंगी घाबरत नव्हती.
ममताचे वडील आणि भाऊ या दोघांच्या विचारात जमीन आसमानचे अंतर होते. आपली आई, बहीण, पत्नी यांच्याप्रमाणे तिने घरकाम करावे. कुस्ती बिस्तीच्या भानगडीत पडू नये. कारण ममता चांगली कुस्तीपटू असल्याने दादाचे मित्र त्याला चिडवायचे. असेच हे दोघे बहीण भाऊ पट्टीचे असल्याने कोणी कुस्ती खेळण्यासाठी तयार होईना म्हणून बहीण भावात कुस्ती झाली आणि दादा हरला..दादाचा राग अनावर झाला. गावात नाचक्की झाली. मित्र परिवार व इतर चिडवू लागले..गावात चर्चेला उधाण आले महिला असून पुरुषांसारखे पूर्ण कपडे काढून कुस्ती खेळते..हे सर्व दादाला लाजिरवाणे वाटतं असे त्याचा पारा चढायचा तो वडिलांना वारंवार सांगत होता. अनेक वेळा घरात या गोष्टीवरून वाद झाले… खंडोजी पाटील दुर्लक्ष करत होते. कोणत्याही हंगामात गेल्यावर ममताईबद्दल नको त्या चर्चा रंगत होत्या तो खजिल व्हायचा खूप खूप राग येत होता. असेच दैनिक वादाचे रूपांतर मोठया वादात झाले. दोघांना राग आवरणे कठीण झाले…बहिणीने भावाला हरवावे याचे टोमणे सतत वडील दादास देत होते.. बहिणीविषयी त्याच्या मनात असलेला संकुचित विचार आणि त्याचे डोळे मोठे करून बोलणे हे वडिलांना सहन झाले नाही… त्या रागाच्या भरात इंग्रज अधिकाऱ्यांनी डोंगरावर वास्तव्यास असल्याने स्वरक्षणासाठी दिलेल्या बंदूकीतून गोळी झाडली आणि वाघासारखा धिप्पाड देह असलेला दादा क्षणार्धात खाली कोसळला. बापरे! बापरे! बापाने पोराला संपविले. जंगलातील प्राणी, पक्षी भयाने थरथर कापले असावेत अशी भयावह परिस्थिती…. खंडोजीच्या दोन्ही बायकांनी आकांत मांडला. दादाच्या बायकोने टाहो फोडला.खबर गावात कळाली.खंडोजी पाटलाच्या दराराने कोणीही अटक करण्यास पुढे धजेना…शेवटी त्यांनीच कबूल केले माझ्या हातून नकळत मोठा गुन्हा झाला मला अटक करा.. थोडयाफार अंतरावर असलेल्या पोलीस, कोतवाल यांनी ताब्यात घेतले. वीस वर्षाची सजा झाली. पुण्यातील येरवडामध्ये रवानगी झाली. बाप तुरुंगात त्यामुळे ममतावर सारी जवाबदारी आली. ज्या कुस्तीसाठी ममतानी आपले बाईपण सोडले त्याच खेळापासून वंचित राहवं लागले.. भाऊ गेल्याचे दुःख मनात होतेच. ज्या वडिलांनी पोरीच्या कुस्तीसाठी जीवाचं रान केलं तेच वडील आज तुरुंगात होते. त्यापेक्षा कुस्ती न खेळण्याचे दुःख फार कमी वाटले.. खरं तर लात मारील तिथं पाणी काढणारी हिंस्त्र प्राण्याबरोबर मुकाबला करणारी, जोर बैठका मारणारी अशी ही सबला नारी पण परिस्थितीने हतबल झालेली.खंडोजी पाटील अधिकाऱ्यांना नेहमी मदत करत असल्याने त्यांची पाच वर्षाची सजा कमी होऊन ते घरी परतले.. कालांतराने ममताईचे कुस्तीत पुनरागमन झाले… परंतु मागच्या सारखी मज्जा राहिली नाही… लोकांना माहित व्हायला लागले ही महिला आहे. म्हणून कोणी खेळण्यास तयार होत नव्हते….
अशी होती ममताई… लेखकांच्या काही ओळी
वाटेवरील काटे तुडवित
ममता पहेलवान जात होती
जाणाऱ्या त्या वाटेवर ती,
नाव आपले कोरत होती
जेव्हा स्रियांना नव्हती मुभा
जगाबाहेर येण्याची
तुम्ही दिली संधी,
तिला पैलवान होण्याची
अशा काही ओळी मनाला स्पर्शून जातात….
एका हंगामात कुस्ती खेळत असताना पहिलवानास कळले ही महिला आहे.. तेव्हा अर्ध्यावर डाव मोडला. ममताईने नाराज होऊन कुस्तीतून पूर्णपणे रजा घेतली.
त्या काळी पुरुषांना आव्हान देणारी देशातील एकमेव महिला दुर्लक्षित राहिली.. महिला म्हणून कधीच ज्यांचा कधीच सन्मान झाला नाही.एक प्रेरणादायी कार्य म्हणून नवीन पिढीने याची दखल नक्कीच घ्यावी…पुढे नंतर ममताई अध्यात्मिककडे वळाल्या पेहराव बदलला देवाच्या भक्तीत रममान होऊ लागल्या. कुस्तीमधील चमकता तारा वयाच्या नव्वदाव्या वर्षी कुंभमेळा पर्व चालू असताना 1984 साली ममदापुर, ता नांदगाव, नासिक येथे अनंतात विलीन होऊन निखळला गेला..नी संघर्षमय कुस्तीचा प्रवास ममताईचा संपला नी सिन्नर मधून कुस्ती पोरकी झाली..
त्या काळी रूढी परंपरेच्या बेड्या झुगारून, स्रियांना मानाचे स्थान नसताना खंडोजी पाटलांनी हे ऐतिहासिक कार्य केले त्यांना मानाचा सलाम..मुलगा वंशाचा दिवा, म्हातारपणाची काठी हे ब्रीद खोटे ठरवत अपवाद म्हणून राहिले… अनेक संघर्षमय प्रवासातून, मान, सन्मान, अपमान, आयुष्यात येणारी वादळे , शारीरिक, मानसिक त्रास, लोकांच्या दोषी नजरा,
डोंगरावरील आव्हानात्मक जीवनशैली या सर्वांचा सामना करताना येणाऱ्या अडचणींवर मात करून आज त्या पडद्याआड राहणे म्हणजे एक शोकांतिका….ममताईस अंधःकारातून प्रकाशमान करण्याचे काम लेखकांनी केले… त्यांचे खरं मनापासून आभार… अनेकांनी त्याचबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया कानडी समाजाचे भूषणावह आहे…लेखक मा.रणजित पवार यांनी लिहिलेला त्यांचा विविध पैलूतील जीवनप्रवास वाचकांना नक्कीच आवडेल यात तिळमात्र शंका नाहीच ममताई यांचा कुस्ती खेळातील किर्तीचा कळस साता समुद्रपलीकडे पोहोचावा ..अशी आशा व्यक्त करते.. ममताई यांच्या उल्लेखनीय महाराष्ट्र बुक ऑफ रेकार्ड कार्यास कोटी कोटी सलाम…….

©® लेखिका,
सौ. दिलशाद यासीन सय्यद,
अकोले, अहमदनगर
9850923961