लिंपणगाव परिसरातील शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण!

अंकुश तुपे
श्रीगोंदा प्रतिनिधी
नॅशनल हायवे 548 डी या रस्त्यावरील पाणी शेतात व घरामध्ये जात असल्याच्या कारणास्तव लिंपणगाव सह अन्य गावातील शेतकऱ्यांचे श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले
श्रीगोंदा तालुक्यातील मौजे लिंपणगाव, होलेवाडी तसेच शेंडगेवाडी श्रीगोंदा या ठिकाणी नॅशनल हायवे एन. एच. ५४८ डी या रस्त्याच्या लगत शेतामध्ये व घरामध्ये जे पावसाचे पाणी जाते, त्याची अद्याप पर्यंत उपाययोजना झालेली नाहीत यासाठी शेतकऱ्यांनी श्रीगोंदा येथील तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. श्रीगोंद्याचे तहसीलदार व संबंधितांना दिलेल्या निवेदनात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पुढे म्हटले आहे की ,आम्ही वरील ठिकाणचे रहिवासी असून, 'वरील विषयासंदर्भात मार्च महिन्यापासून वेळोवेळी अर्ज व निवेदन देऊन तसेच प्रत्यक्षात सांगून देखील पावसाचे पाणी जाण्याचे नियोजन असते ते अद्याप करण्यात आलेले नसून ,त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान झालेले आहे. त्याकरीता संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रत्यक्ष सांगून व पाहणी करुन देखील उपाययोजना करण्यास उडवाउडवीची उत्तरे देतात व शेतकरी बांधवास वेठीस धरून वेगवेगळे कारणे सांगून टाळाटाळ करतात.
शेतकऱ्यांच्या शेतात ज्या पिकांचे नुकसान झालेले आहे, ते तातडीने देण्यात यावे व जो नॅशनल हायवे तसेच भारत गॅस रिसोर्सेस लि. या कंपनीने गॅसची पाईपलाईन केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पावसाच्या पाण्याची अडवणूक करुन ठेवलेली आहे. त्यामुळे देखील शेतीमालाचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच त्या सासलेल्या पावसाचे पाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांना व शेतकरी बांधवांना होत आहेत त्या संबंधित ठेकेदाराला सांगून व संबंधित नॅशनल हायवेचे अधिकारी व गॅस पाईपलाईनचे अधिकारी यांनी रस्त्यालगत नाल्याचे नियोजन करून ज्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ते किंवा वस्त्या आहेत, त्या ठिकाणी सिमेंट पाईप टाकून द्यावेत व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा याकरिता आम्ही 6 ऑक्टोबर पासून सर्व न्याय मागण्यांकरिता तहसीलदार यांच्या कार्यालया समोर उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. असे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर अन्यायग्रस्त शेतकरी निलेश कुरुमकर, सुभाष होले, संपत होले, लहू होले, शिवाजी होले, दिलीप होले ,रामदास होले, सुरेंद्र शेंडगे, ऋषिकेश शेंडगे, राजेंद्र शेंडगे, सुदाम शेंडगे, बबन शेंडगे, संजना शेंडगे, मंगल शेंडगे आदि सह जवळपास 35 शेतकऱ्यांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या असून ,ते सर्व शेतकरी न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणावर ठाम आहेत या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक श्रीगोंदा व वरिष्ठ प्रशासनाला पाठवले आहेत.