जुन्या सवंगडयांनी शाळेला दिली २ लाख९ हजारांची गुरुदक्षिणा!

पेठे विद्यालयातील जुने सवंगडी
५० वर्षांनी एकमेकांना भेटले
नाशिक प्रतिनिधी
स्वकर्तृत्वाच्या बळावर समाजातील विविध क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे पेठे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी वयाच्या सत्तरीतही वर्गातील मैत्री बळकट केली.
सत्तरीतसुद्धा मित्रांना जोडून पुन्हा शालेय जीवनाचा आनंद लुटला हा उपक्रम तरुणाईला नवी दिशा देणारा आहे, असे गौरवोदगार नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष दिलीप फडके यांनी काढले.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त पेठे विद्यालयाच्या १९६९-७० बॅचच्या इयत्ता ११ वी (मॅट्रिक) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पेठे विद्यालयात नुकताच मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
शाळा सोडून तब्बल ५० वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अजूनही तेव्हाचे विद्यार्थी व आजचे जेष्ठ नागरिक जेव्हा शाळेत एकत्र आले तेव्हा स्मृती पटलावर कोरल्या गेलेल्या शालेय आठवणी, चेष्टा मस्करी, खोड्या, खेळ आणि त्याचबरोबर शिक्षकांबद्दलच्या जिव्हाळ्याच्या आठवणी यामुळे सर्वच भावूक झाले होते. आपल्या शालेय आठवणींमध्ये सर्वच मित्र हरखून गेले होते. पाचवी ते अकरावी या ७ वर्षांत अनुभवलेली शाळा, मिळालेले ज्ञान, संस्कार, शाळेत केलेली धमाल यात सर्व सवंगडी अक्षरशः दंग झाले होते.
प्रारंभी विद्यार्थ्यांचे आगमन होताच शाळेने दिलेल्या अल्पोपहरामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. नंतर शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी फेर फटका मारला. यावेळी शाळेतील जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सर्वजण वर्गात आपल्या जागांवर जाऊन बसताच आठवणींना उमाळा आला. सतिश जोशी यांनी शाळेची घंटा वाजवून वातावरण निर्मिती केली.
शाळेचा फेरफटका आणि काळानुरूप शाळेचे बदललेले रुपडे पाहून सर्वजण सुखावले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात अनिल सुकेणकर यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक करून १९७० च्या मित्रांच्या ग्रुपची आत्तापर्यंतची वाटचाल सांगितली.
कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन वसंत देव, घोडके व करंदीकर यांच्या हस्ते झाले. तर सरस्वती पूजन लक्ष्मीकांत जोशी, प्रकाश गुजराथी, अरुण गाडगीळ, राजू क्षीरसागर आणि संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेची ‘या कुन्देन्दु तुषार हार धवला…’ ही लहानपणापासून पाठ असलेली शाळेची प्रार्थना मोठ्या आवाजात एका सुरात म्हटली. विशेष म्हणजे जागेवरच उभे राहून सर्वांनी पिटीचा व्यायामही केला. यासाठी मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण अडावदकर यांनी केले.
मॉनिटर तुषार इनामदार यांनी रोल कॉल घेतला, त्याचवेळी राजू क्षीरसागर यांनी त्या त्या विद्यार्थ्याची उपस्थितांना थोडक्यात ओळख करून दिली. नोकरी व्यवसायामुळे बाहेरगावी आणि परदेशी असलेले ५० वर्षांनीच एकमेकांना बघत होते.
उपस्थित असलेल्यां विद्यार्थ्यांपैकी डॉ. कैलास कमोद, गुलाम शेख आणि माधव गोखले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, शाळा, गुरुजन यांविषयी कृतज्ञता आणि आदरभाव व्यक्त केला. आयुष्यात यशस्वी होण्यात शाळेचा असलेला सिंहाचा वाटा प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवत होता. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणाऱ्या पुस्तिकेचे अनावर कैलास पाटील, चंद्रशेखर वाड, दिलीप फडके, रमेश बापट, सुरेश पाटील, मांडवगणे, सतिश वाघ, अनिल तुपे, अडावदकर, देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

शाळेतर्फे मनोगत व्यक्त करतांना मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी शाळेच्या वाटचालीची माहिती दिली. यावेळी रमेश बापट, सतीश महाजन, पाराशरे, विसपुते आणि सूर्यवंशी यांच्या हस्ते संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेच्या शिक्षकवृंदांचा सत्कार
केला. शाळेच्या प्रेमापोटी विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा स्वरुपात संस्थेस २ लाख ९ हजार रुपयांचा धनादेश किशोर पवार, माधव गोखले, मंगेश कुलकर्णी यांच्या हस्ते शाळेस सुपूर्त केला.
या स्नेहमेळाव्यास ५२ विद्यार्थी उपस्थित होते. सतीश कचोळे यांनी गुरुजनांचे आभार मानले. असा स्नेहमेळा पुन्हा घडवून आणण्यासाठी भेटण्याचे अभिवचन देऊन ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी शाळेचा निरोप घेतला.