शरद पवारांच्या उपस्थिती त दूध प्रश्नावर शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले !

संगमनेर प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांची भव्य ट्रॅक्टर रॅली
अकोले प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरदचंद्र पवार शेतकरी नेते डॉ अजित नवले यांच्या समवेत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, महाराष्ट्र च्या शिष्टमंडळाने ने आज मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले
शेतकऱ्यांकडून होणाऱ्या दुध खरेदीचे दर सातत्याने कमी होत असल्याने गेली वर्षभर राज्यभरातील शेतकरी त्रस्त आहेत. गेली वर्षभर आंदोलने करून या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर उतरत आहेत. शासनाने आंदोलनांची दखल घेत ५ जानेवारी २०२४ रोजी प्रतिलिटर ५/- रुपये अनुदान जाहीर केले. मात्र हे अनुदान केवळ दोन महिने देण्यात आले. अनेक अटी शर्ती लावल्यामुळे हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले. परिणामी निवडणुकांनंतर २८ जून २०२४ पासून दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनात उतरले. सरकारने या पार्श्वभूमीवर दुध संघांनी व कंपन्यांनी शेतकऱ्यांना ३.५/८.५ गुणवत्तेच्या दुधाला प्रति लिटर ३०/- रुपये दर द्यावा, सरकार या दुधाला ५/- रुपये अनुदान देईल असा तोडगा काढला. मात्र राज्यात खाजगी दुध संघांना असा दर देण्यासाठी बाध्य करणारा कायदा नसल्याने कंपन्या ३०/- रुपये दर देण्यास
तयार नाहीत. वेगवेगळ्या क्लुप्त्या करून ते भाव देणे टाळत आहेत.
- काही कंपन्यांनी ३.५/८.५ गुणवत्तेच्या दुधाला ३०/- रुपये दर जाहीर केले. ५ जुलै २०२४ च्या शासन आदेशाप्रमाणे एस.एन.एफ./ फॅट कपात प्रति युनिट ३० पैसे लागू केली. मात्र ३.२/८.३ गुणवत्तेच्या दुधाला ही कपात ३० पैसे ऐवजी १/- रुपया केली. जेणे करून राज्यातील ३५ टक्के दुध ज्याची विविध कारणांमुळे गुणवत्ता ३.२/८.३ च्या खाली आहे, अशा दुधाला पूर्वीपेक्षाही कमी दर मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली.
- बल्क कुलर चालक, , प्राथमिक संस्था, वाहतूक इत्यादीचा खर्च व कमिशन यावर खाजगी संघ ३.५०/- रुपये खर्च करत होते. त्यांनी ते आता १.५०/- रुपयांवर आणून ठेवले आहेत. बल्क कुलर चालक व प्राथमिक संस्था चालक यांची त्यामुळे कोंडी झाली आहे.
- काही खाजगी संघांनी ३.५/८.५ साठी ३०/- रुपये दर जाहीर केला, मात्र प्रतिजीवके इत्यादी अटी लावून
शेतकऱ्यांना हैराण केले आहे.
सरकारच्या वतीने अर्थसंकल्प मांडत असताना ३०/- रुपये दर संघ देतील व सरकार ५/- रुपये अनुदान देईल
असे २८ जून २०२४ रोजी जाहीर केले होते. यानुसार शेतकऱ्यांना १ जुलै ते १० जुलै २०२४ च्या दसवड्यात खाजगी व सहकारी संघांनी ३०/- रुपये प्रमाणे दर देणे अपेक्षित असताना, राज्यभरातील बहुतांश संघांनी
२७/- रुपये प्रमाणे पेमेंट काढले आहे. या कालावधीत शेतकरी अनुदाना पासूनही वंचित राहिले आहेत.
- अनुदान हा काही कायमस्वरूपीचा उपाय होऊ शकत नाही हे शेतकऱ्यांना माहित आहे. सरकारनेआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ५ जानेवारी २०२४ रोजी अनुदानाची घोषणा केली. मात्र अनुदान केवळ २ महिनेच
मिळाले. पुढील काळात ११ जुलै २०२४ पर्यंतच्या काळात दर कोसळलेले असताना व शेतकरी प्रतिलिटर
१०/- रुपयांचा तोटा रोज सहन करत असताना कोणतेही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही.
निवडणुकांनंतर अनुदान बंद होईल अशी रास्त भीती शेतकऱ्यांना यामुळे वाटते आहे. शिवाय ऑक्टोबरमध्ये
दुध क्षेत्रात ‘फ्लश’ सीजन सुरु होईल. या सिजनमध्ये ऑक्टोबर ते मार्च या काळात दुधाचा पुरवठा वाढतो.
परिणामी दुधाचे दर पडतात. आत्ताच ठोस उपाय योजना न केल्यास यामुळे दुधाचे भाव आणखी पडतील
अशी शेतकऱ्यांना भीती आहे.
अशा सर्व पार्श्वभूमीवर दुध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले असून अनुदान नको ४० /- रुपये निश्चित भाव दया व
असे व्हावे यासाठी ठोस उपाययोजना करा अशी मागणी करत आहेत.
राज्यात २० लाख लिटर दुध अतिरिक्त उत्पादित होते आहे. या अतिरिक्त दुधाचे नियोजन करणे आवश्यक आहे. कोवि
काळात सरकारने स्वत: रोज १० लाख लिटर दुध खरेदी करून त्याची पावडर बनवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा
प्रयत्न केला होता. अशी पावडर शालेय पोषण आहार व गरोदर मातांना देता येऊ शकते.
राज्यात दुधात ३० टक्के भेसळ होत असल्याचे दुग्धविकास मंत्री सांगत आहेत. ही भेसळ थांबविली तरी अतिरिक्त
दुधाचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत होऊ शकते.
देशभरातील ज्या राज्यांमध्ये कमी दुध उत्पादन होते त्या राज्यांबरोबर चर्चा करून अशा राज्यांना दुध पुरविण्याबाबत
दीर्घ मुदतीचे नियोजन करता येऊ शकते.
अशा व या सारख्या मुलभूत व शाश्वत उपाय सरकारने करावे व दुधाला वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर ४०/-
रुपये दर शेतकऱ्यांना मिळेल असे नियोजन करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आ हे
तालुक्यातील शेतकरी शेकडो ट्रॅक्टर घेऊन कोतूळ ते संगमनेर प्रांत कार्यालय अशी ट्रॅक्टर रॅली काढत आहेत.
मागण्या
१. दुधाला किमान ४०/- रुपये प्रति लिटर भाव द्या.
२. प्रति युनिट एस.एन.एफ. / फॅट कपात व वाढीचा दर समान ३० पैसे ठेवा.
३. ३.२/८.३ गुणवत्तेच्या खालील दुधाचे एस.एन.एफ. /फॅट कपात, प्रति युनिट ३० पैसेच ठेवा.
४. ५ जानेवारी २०२४ ते १० जुलै २०२४ या काळात दुध घातलेल्या सर्वांना विना अट अनुदान द्या.
५. कठोर पावले टाकून सर्व प्रकारची दुध भेसळ बंद करा.
६. पशुखाद्याचे भाव कमी करा.
७. खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करा.
८. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी व रिव्हेन्यू
शेअरींगचे धोरण लागू करा.
९. राज्यात दुग्धमुल्य आयोगाची स्थापना करा.
१०. अनिष्ट ब्रँड वार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्विकार करा.
११.मिल्कोमीटर व वजन काट्यात होणारी दूध उत्पादकांची लुटमार थांबविण्यासाठी स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची
नियुक्ती करा.
१२.दुध पावडर आयात बंद करा व दुध पावडर निर्यातीला प्रोत्साहन दया.
१३.सरकारी निधीतून मोफत पशु जीवन विमा व पशु आरोग्य विमा योजना राबवा.
कोतुळ दूध आंदोलन व ट्रॅक्टर रॅलीचे मा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थित मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन सादर केले.
डॉ. अजित नवले, विनोद देशमुख, अभिजित देशमुख, बबलू देशमुख, प्रकाश देशमुख व नामदेव साबळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
उद्या 23 जुलै रोजी कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅली निघणार असून अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक पक्ष भेद विसरून शेतकरी म्हणून आंदोलनात सामील होत आहेत.
मा. शरद पवार साहेब यांनी अकोले येथील मेळाव्यात शब्द दिल्ययाप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांकडे दूध उत्पादकांचा प्रश्न मांडण्यासाठी पुढाकार घेतला. मा. मुख्यमंत्री साहेबांनी पुरेसा वेळ दिला. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती मा. शरद पवार साहेब व मा. एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार व्यक्त करत आहे.
उद्या होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर व ट्रॉलीसह सहभागी व्हावे असे आवाहन करत आहोत.
दुधाला 40 रुपये मिळावा, दुधाला एफ.आर.पी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दूध भेसळ थांबावी, पशुखाद्याचे दर कमी करावेत इत्यादी मागण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सुरू असलेले आंदोलन प्रश्न सुटेपर्यंत सुरू ठेवण्याचा संकल्प दूध उत्पादकांनी केला आहे.
उद्या निघणाऱ्या भव्य ट्रॅक्टर रॅलीमध्ये अकोले व संगमनेर तालुक्यातील शेकडो ट्रॅक्टर सामील होत असून ट्रॅक्टर रॅलीची रांग किमान दहा किलोमीटर लांब असेल व 55 किलोमीटरचे अंतर पार करून रॅली संगमनेर शहरात धडकेल.
दूध व्यवसायात शेतकऱ्यांसाठी केवळ शेण शिल्लक राहिले आहे. ट्रॅक्टरच्या मधून शेण नेत प्रांत कार्यालयाच्या समोर ते ओतून शेतकरी या रॅलीच्या माध्यमातून आपला असंतोष व्यक्त करणार आहेत.
23 जुलैच्या भव्य रॅली नंतर सुद्धा कोतुळ येथे सुरू असलेले व राज्यभर सुरू असलेले आंदोलन प्रश्न सुटेपर्यंत सुरूच राहणार आहे.