पारनेर तालुक्यातील ढोकी येथे दोन गटात हाणामारी

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुयातील ढोकी येथील धरमवस्तीवर शुक्रवारी सकाळी ११ वाजता शेतात तास टाकण्यासाठी ट्रॅक्टर नेत असताना पाईप काढण्याच्या वादातून दोन गटात काठ्या कु-हाडीने तुंबळ हाणामारी झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे दोन्ही गट एकत्र राहत असून किरकोळ कारणातून मारहाण झाली असल्याने अनेक तर्कवितर्क केले जात आहेत.
या हाणामारीत सात जण जखमी झाले असून पाच जणांना नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे पारनेर पोलिसांनी या दोन्ही गटाच्या परस्पर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते. या दोन गटातील मारहाणीत तीन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या हातावर व पायावर कुर्हाडीने मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिराबाई भिमराज फरे (वय ३५), भीमराज भाऊसाहेब फरे (वय ४५), बारकू भीमराज फरे (वय १२), जयश्री भिमराज फरे (वय १६), बापू भीमराज फरे (वय १७, सर्व रा. धरम वस्ती, ढोकी, ता. पारनेर) हे एका गटातील जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसर्या गटातील उत्तम बाळासाहेब धरम (वय २०) व बाळासाहेब विश्वनाथ धरम (वय ५५) हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्याबरोबर सागर बाळू धरम, भोरी सागर धरम, उषाबाई बाळू धरम यांचा जखमींमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच टाकळी ढोकेश्वर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गवळी, ज्ञानेश्वर साळवे यांनी गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.