पारनेर येथील आत्मज्ञानी गणपत बाबा मठात होणार गुरुपौर्णिमा संपन्न !

शाहीरी भेदीक ढोलकी डफ तूनतुण्याच्या गजरात होणार गुरु शिष्यांचा मिलाप !
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
श्री.सत्य अविनाश पारखपद समाजाच्या ढोलकी ढफ तूणतुन्याच्या माध्यमातून अध्यात्मिक साहित्याची निर्मिती करत,भेदिक भजन महाराष्ट्रभर पोहोचविणारे तालुक्यातील थोर संत आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांच्या मठात
गुरु पौर्णिमेचे औचित्य साधत सोमवार दि.३जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या पवित्र व मंगलमय मुहूर्तावर पारनेर जामगाव रोड येथील आत्मज्ञानी गणपत बाबा मठात सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुरु पौर्णिमेच्या आयोजन करण्यात आलेले आहे.
गुरु व शिष्यांमधील अतूट नात्यांचा बंध दृढ करण्याचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा,गुरु पासून शिष्याला ज्ञानाचे अलौकिक दान यावेळी गुरु शिष्याला देत असतो.शिष्याच्या विचारातील व मनातील अंधःकार,अज्ञान व दुर्गुण दूर करण्यासाठी शिष्याला सदमार्गाची जाणीव करून देत त्याच्या आयुष्यात ज्ञानाची ज्योत पेटवून अज्ञानाचा अंध:कार दूर करणारा गुरु आसतो.याच गुरुची गुरुपूजा करत ज्ञानाची व विचारांची देवाणघेवाण या दिवशी गुरु शिष्य करत असतात.
महाराष्ट्रातील थोर संत आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांच्या आध्यात्मिक साहित्य वाड्मयाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण देत श्री.सत्य अविनाश पारखपद समाज संपूर्ण महाराष्ट्रभर अध्यात्माचा प्रचार व प्रसार करत आहे.आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव ब्रह्मनिष्ठ हरिदास महाराजांनंतर या सत्य अविनाश पारखपद मंडळाची गुरु गादी प.पु.स.किसन बाबा चौरे यांनी सक्षमपणे सांभाळली.त्यांच्या पश्चात प.पु.स.बबनदादा चौरे यांनी ही गुरूगादीचे पाईक म्हणून ही गुरु मालिका अखंडित ठेवत महाराष्ट्रभरात अनेक जिल्ह्यांमध्ये आत्मज्ञानी गणपत बाबांचा आध्यात्मिक साहित्याचा प्रचार व प्रसार करत,गुरु शिष्यांमधील ज्ञानदानाचे अतूट नाते अखंडित ठेवले.
महाराष्ट्राची लोककला असणाऱ्या शाहिरी बाण्यातून ढोलकी डफ तुंतुन्याच्या माध्यमातून भेदिक भजनांच्या गजरात प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमा साजरी होत असते.महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यांमधील नामवंत शाहीर मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत असतात.याही वर्षी सकाळी दहा वाजता सद्गुरु समाधी पूजन दुपारी बारानंतर एकतारी व सांप्रदायिक भजन , सायंकाळी ७ वाजता पारनेर शहरातील जामगाव रोड या ठिकाणी असणाऱ्या आत्मज्ञानी गणपत बाबा चौरे मठात सर्व शिष्यसंप्रदायाच्या उपस्थितीत तसेच पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरु पादुकांचे पूजन व महापूजा होनार असुन सायंकाळी साडे सात ते नऊ पर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.रात्री नऊ ते पहाटेपर्यंत महाराष्ट्रातून आलेल्या नामवंत शाहीर मंडळींच्या आध्यात्मिक भेदिक भजनाच्या निनादात गुरु मार्गावर कलगीतुरा हा पारंपारिक अध्यात्मिक सवाल जवाबाचा कार्यक्रम होणार असून गुरूकडून शिष्यांना बीजमंत्र देत आध्यात्मिक विचारांची देवाण-घेवाण या मंगलमय प्रसंगी होणार आहे.
तेव्हा गुरुपौर्णिमेच्या या पवित्र उत्सवास उपस्थित राहून या मंगलमय सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन प.पू.स.बबन दादा चौरे व पारखपद मंडळाचे ज्येष्ठ शाहीर
निजामभाई शेख यांच्यासह समस्त पारखपद मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.