शेवगाव च्या कु. सय्यद जिनत व कु.काळे अवंतिका या विद्यार्थिनींची पंजाब येथे होणाऱ्या सायकलिंग ट्रॅक स्पर्धेसाठी निवड

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या आंतर विभागीय सायकलिंग ट्रॅक स्पर्धेमधून शेवगाव तालुक्यातील आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कु. सय्यद जिनत व कु.काळे अवंतिका या विद्यार्थिनींची पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सायकलिंग ट्रॅक स्पर्धेसाठी निवड झाली असल्याने परिसरातून विद्यार्थिनींचे कौतुक केले जात असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.ए.दुकळे यांनी दिली.
शेवगाव दि.(०८) तालुक्यातील निर्मलाताई काकडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील कु.सय्यद जिनत व कु.काळे अवंतिका यांची पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विदयापीठ सायकलिंग ट्रॅक स्पर्धेसाठी निवड झाल्याने विद्यालयाच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.ए.दुकळे हे होत.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना दुकळे म्हणाले की, शेवगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी सायकलिंग ट्रॅक सारख्या स्पर्धेमधून आज राज्यस्तरावर आपले, वडिलांचे व महाविद्यालयाचे नाव झळकवित आहेत हि आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. जिद्द, चिकाटी व कठीण परिश्रम केल्यास यश निश्चित मिळते. त्यांच्या या परिश्रमाचा व जिद्दीचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे असेही ते बोलतांना म्हणाले.
यावेळी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड.डॉ. विद्याधर काकडे, जि.प. सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मणराव बिटाळ, प्राचार्य डॉ.पी.ए. दुकळे तसेच सर्व प्राध्यापक बंधू भगिनींनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या गुणवंत विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष निजवे यांनी तर आभार प्रा.अमोल आहेर यांनी मानले.