मुक्त विद्यापीठ : कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. नितीन ठोके

अल्युमनी असोसिएशनतर्फे केला सत्कार
नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. नितीन ठोके यांची नुकतीच निवड झाली. डॉ. ठोके यांच्या या निवडीबद्दल अल्युमनी असोसिएशन ऑफ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. नितीन ठोके हे मुक्त विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, ते अल्युमनी असोसिएशनच्या कार्यकारी सदस्यदेखील आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अल्युमनी असोसिएशनच्या वतीने कुलसचिव तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश देशमुख, परीक्षा नियंत्रक बी.पी. पाटील, उपकुलसचिव डॉ. कैलास बोरसे, सुनील विभांडिक, सचिव संतोष साबळे आदी यावेळी उपस्थित होते.
विषय विशेषज्ञ (कृषि विस्तार) म्हणून गेले २२ वर्ष काम पाहताना त्यांनी विशेषत: आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषि विषयक तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी काम केले. एकात्मिक शेती पद्धतीतून तंत्रज्ञानाच्या प्रसारात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, तंत्रज्ञान चाचणी, शेतकरी मेळावे, तंत्रज्ञान महोत्सव इ. माध्यमांमधून त्यांनी नाशिक जिल्ह्यात तंत्रज्ञान प्रसाराचे काम केले आहे. याशिवाय विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर त्यांनी मधुमक्षिका पालनाचे युनिट उभारले असून ग्रामीण युवकांना त्यातील प्रशिक्षण देत आहेत.
‘आत्मा’ अंतर्गत नाशिक जिल्ह्याचा विस्तार व संशोधन आराखडा तयार करण्यात त्यांनी योगदान दिले आहे. कृषि क्षेत्रातील संशोधनातील ९ शोधनिबंध, १३ पुस्तकांचे लिखाण, ७ राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणात सहभाग, ३१ आकाशवाणी मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. त्यांनी कृषि विस्तार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी त्यांना साधना- डॉ. वाय. एस. परमार उद्यानविद्या व वनिकी विद्यापीठ, हिमाचल प्रदेश यांच्या राष्ट्रीय स्तरावरील ‘अचिवर अवार्ड-२०१७’ ने सन्मानित करण्यात आले आहे.
कृषी क्षेत्राला बळकटी देण्याचा संकल्प –
यावेळी बोलताना डॉ. ठोके म्हणाले, शेतकऱ्यांना गरजेनुरूप प्रशिक्षण, एकात्मिक शेती पद्धतीच्या माध्यमांतून आदिवासी गावांत सर्वांगीण विकास व त्यांचे उत्पन्न वाढविणे, जैविक खते व औषधांच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण व सेवा पुरविणे, जातिवंत रोपांचा पुरवठा, याप्रकारची कामे कृषि विज्ञान केंद्र करीत असताना या सुविधांना अधिक बळकटी देण्यासाठी प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेवटी संस्थेचे सचिव डॉ. संतोष साबळे यांनी आभार मानले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. बी. पाटील तसेच विद्यापीठ परिवारातील कर्मचाऱ्यांनीदेखील त्यांचे अभिनंदन केले आहे.