दौंडच्या भीमा नदी पात्रात आढळले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह!

दत्ता ठुबे
पारनेर तालुका प्रतिनिधी
भीमा(ता.दौंड) नदीपात्रात आज तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले. यापूर्वी 4 मृतदेह सापडले होते, पण आता एकूण मृतांची संख्या सात झाली आहे. सातही जण एकाच कुटुंबातील असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पाच पथके तयार केली असून ती विविध ठिकाणी दाखल झाली आहेत. पीएमआरडीएच्या शोध पथकाने तीन मुलांचे मृतदेह शोधून काढले.
हे सर्व जण एक वर्षापासून निघोज (ता. पारनेर) येथे मजुरीसाठी आले होते. पवार पती पत्नी हे फुलवरे यांचे सासू सासरे आहेत.मोहन उत्तम पवार (वय ४५) संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय-४० दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड) शाम पंडीत फुलवरे (वय-२८), राणी शाम फुलवरे (वय-२४) रितेश उर्फ भैय्या (वय-७), छोटू शाम फुलवरे (वय-५) कृष्णा शाम फुलवरे (वय-३, चौघेही रा. हातोला, ता. वाशी, जि.उस्मानाबाद .
या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.पाच दिवसात टप्प्याटप्याने चार मृतदेह सापडले. बुधवारी (ता. १८) पारगाव येथील मच्छीमारांना एका महिलाचा पहिला मृतदेह सापडला. त्यानंतर रविवारपर्यंत दोन पुरूष व एका महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.राणी फुलवरे यांच्या कपड्यांमध्ये मोबाईल व सोने खरेदीची पावती मिळाल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास केला असता. त्यांच्या बरोबर आणखी तीन मुल असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
त्यामुळे काल सायंकाळी वाघोली येथील पीएमआरडीएचे शोध पथक काल सायंकाळी पाचारण करण्यात आले. या पथकाने तीनही मुलांचे मृतदेह आज शोधून काढले. शेवटचा मृतदेह दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मिळाल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. एक मुलगा पारगावच्या पुर्वेस सापडला तर दोन मुलांचे मृतदेह नानगावच्या रासाईदेवी मंदिराजवळ सापडले. तीघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आले. यांच्याकडे काही वाहन असल्याची शक्यता गृहीत धरून यवत पोलिस भीमा नदी पात्रात वाहनाचा शोध घेत होते.