
पत्रकार म्हणजे वारा आहे — रामराव महाराज ढोक
संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र सावरगाव घुले येथे चंपाषष्ठी निमित्ताने रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रसाळवाडी वाणीतून रामायण कथा सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील पत्रकारांनी या कथेला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी पत्रकार हा वारा आहे आणि सुगंध पसरविण्याचे काम वारा करत असतो. असे प्रतिपादन त्यांनी केले.
पुढे बोलताना ढोक महाराज म्हणाले की, सावरगाव घुले नगरीत रामायण कथा रुपी चंदन आहे आणि तो सुगंध हे पत्रकार पसरवीत असतात. काही मंडळी पत्रकारांवर नाराज होतात, आमचं असं का छापलं ? यात वाऱ्याचा काय दोष आहे वाऱ्याचे काम आहे पसरविणे, तुझी घाण असेल तर त्याला वारा काय करणार असं ही त्यांनी सांगितले. जो चंदनासारखा वागेल तर सुगंध पसरेल आणि तुझी घाण आहे तर त्याचा दुर्गंधी पसरणारच. कारण पत्रकारच काम हे पसरविण्याचे काम आहे तो वाराच आहे.
यावेळी सर्व पत्रकारांचा सन्मान रामयनाचार्य ढोक महाराज यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला, सीता स्वयंवरने कथेचा शेवट झाला. त्यांच्या रसाळ वाणीतून भाविकांसाठी ऐकवली जाणारी रामायण कथा ऐकण्यासाठी तालुक्यातील भाविकांनी एकदा या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.