ठाकरवाडीला स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ठाकरवाडीला घरात मिळाली वीज !
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील पिंपळदरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या खंडोबावाडी जवळील ठाकरवाडीला लाल बावट्याच्या चिवट संघर्षामुळे वीज मिळाली आहे.
स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष होऊनही अद्याप तालुक्यातील अनेक ठाकरवाड्या वीज, रस्ते, पाणी या सारख्या सामान्य नागरी सुविधांपासून वंचित आहेत.
किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली या आदिवासी पाड्यांना, वाड्यांना वीज, रस्ते, पाणी यासारख्या सामान्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष गेली 22 वर्ष सातत्याने संघर्ष करत आला आहे. पिंपळदरी येथील खंडोबाच्यावाडी जवळील ठाकरवाडीला वीज मिळावी यासाठी कॉम्रेड सदाशिव साबळे यांच्या नेतृत्वाखाली 3 फेब्रुवारी 2020 ते 14 फेब्रुवारी 2020 या काळात सलग अकरा दिवस शेकडो आदिवासी, बिगर आदिवासी शेतकऱ्यांनी कोतुळ येथे मुक्काम आंदोलन केले होते. थंडी गारठ्याची पर्वा न करता रात्रंदिवस विविध मागण्यांसाठी हे शेतकरी कोतुळच्या चौकात बसून होते. कोतूळचा मुळा नदीवरील पुल व्हावा या मागणी बरोबरच पिंपळदरी येथील ठाकरवाडीला व पिंपळगाव खांड येथील डोकेवस्ती या ठाकरवाडीला वीज मिळावी या मागण्याही सत्याग्रहात घेण्यात आलेल्या होत्या. दोन्ही ठाकर वाड्यांना वीज देण्यासाठी आवश्यक असणारे विजेचे खांब उपलब्ध करणे, तारा व इतर साहित्य उपलब्ध करणे, यासाठी निधीची आवश्यकता होती. तसेच या विजेच्या वाहिन्या वनविभागाच्या हद्दीतून जात असल्यामुळे वन विभागाची परवानगी काढण्याची अत्यंत जटिल प्रक्रिया पार पाडण्याची आवश्यकता होती. कोतुळच्या चौकात झालेल्या अकरा दिवसाच्या सत्याग्रहामध्ये या वाड्यांना वीज देण्याचे कबूल करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र वन विभागाची परवानगी, प्रकल्प कार्यालयाकडून प्रत्यक्ष निधीची तरतूद आणि ठेकेदारांच्या अडचणींमुळे ही कामे सातत्याने रेंगाळत पडली होती. शेवटी पुन्हा एकदा दिवाळीच्या तोंडावर कॉम्रेड सदाशिव साबळे व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कोतुळ येथील वीज केंद्रावर प्रचंड संघर्ष करण्यात आला. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असा टोकाचा संघर्ष झाल्यानंतर या कामांना गती मिळाली.परिणामी पिंपळगाव खांड येथेही विजेचे खांब उभे करण्या ची प्रक्रिया सुरू झाली असून, पिंपळदरी येथील सर्व खांब उभे झाल्याचे अकोले विभागाचे वीज अधिकारी श्री. बागुल यांनी किसान सभेला कळविले आहे. परिसरातील ठाकर समाजाच्या शेतकऱ्यांचे एबी फॉर्म भरून घेऊन त्यांच्या घरात प्रत्यक्ष वीज येईल यासाठी पाठपुरावा किसान सभेने केला असून पुढील दोन दिवसांमध्ये मीटर बसवण्याची सुद्धा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असेही श्री बागुल यांनी सांगितले आहे.
स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटल्यानंतरही वीज न मिळालेल्या आपल्या घरामध्ये वीज येणार यामुळे ठाकर समाजातील परिसरातील नागरिक व श्रमिक शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.
सदरच्या कामात वीज विभागाचे अधिकारी श्री. बागुल यांचे विशेष सहकार्य लाभले. किसान सभा त्यांचे आभार व्यक्त करत असल्याचे कॉम्रेड सदाशिव साबळे
कॉम्रेड एकनाथ मेंगाळ कॉम्रेड नामदेव भांगरे
कॉम्रेड ज्ञानेश्वर काकड कॉम्रेड राजाराम गंभीरे
कॉम्रेड एकनाथ गि-हे कॉम्रेड सुखदेव मेंगाळ यांनी म्हटले आहे