नागनाथ कोत्तापल्ले मानवतावाद जपणारा कृतिशील लेखक हरपला – छगन भुजबळ

,नाशिक,दि. ३० :- लेखन प्रपंच आणि कृतिशीलतेमुळे ओळखले जाणारे बलदंड व्यक्तिमत्त्व, तसेच साहित्यिकांच्या कोणत्याही वर्तुळात किंवा एखाद्या पंथांच्या चौकटीत न रमणारे ज्येष्ठ लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांचं आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मानवतावाद जपणारा कृतिशील लेखक हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.
छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, ज्येष्ठ लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांनी चार दशके प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रासाठी वाहून दिली. दलित, ग्रामीण विद्यार्थ्यांशी अतिशय आत्मियतेचे नाते असणारे ते गुरुजी होते. मराठीचे अध्यापक, विभागप्रमुख ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि ८६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
संयमी असले तरी कोत्तापल्ले यांचा बाणा मात्र करारीच होता. अनेक विद्यार्थ्यांना आधार देण्यापासून ते त्यांना जीवनात उभे करण्यापर्यंत मोलाचे कार्य आणि नैतिक जबाबदारी पार पाडली हे त्यांचे माणूसपणाचे संचित वेगळा आदर्श निर्माण करणारे ठरले. कोत्तापल्ले यांच्या साहित्याला फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स यांच्या विचारांचे तात्विक अधिष्ठान होते. कोत्तापल्ले यांनी महात्मा फुले यांच्या विचार आणि कार्याचा वेध घेतला. महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी विचार आणि प्रबोधन परंपरा त्यांनी मांडली.
त्यांच्या निधनाने परिवर्तनाच्या चळवळीला वैचारिक दिशादिग्दर्शन करणारा साहित्यिक देशाने कायमचा गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.