देवीभोयरे फाटा ते गव्हाणवाडी फाटा रस्त्यावर खड्डे बुजवण्याच्या मागणीला यश

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा ते गव्हाणवाडी फाटा या रस्त्यावरील खड्डे बुजवून आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक तयार केले आहेत. सामाजिक कार्यकर्ते रुपेश ढवण यांनी गेली पंधरा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे रस्त्यावरील खड्डे बुजवून गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती.
गेली चार दिवसांपूर्वी हे काम जवळपास पूर्ण झाले असून ढवण यांनी त्या ठिकाणी जाऊन या कामांची पाहणी करीत संबंधित अधिकारी, कर्मचारी व मजूर तसेच पाठबळ दिलेल्या जनतेला धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत. याबाबतची माहिती अशी आहे की देवीभोयरे फाटा ते गव्हाणवाडी हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून देवीभोयरे, वडगाव गुंड, निघोज,पठारवाडी, जवळा, राळेगण थेरपाळ, कुरुंद,कोहकडी या गावातील ग्रामस्थांना वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता महत्वपूर्ण आहे.
शिरुर ते आळेफाटा या रस्त्यावर सारखी ये जा सुरु असते.दिवसभरांतून हजारो वाहनांची वर्दळ असते. रस्ता चांगला झाल्याने वाहनांची गती जास्त असल्याने वारंवार अपघातांचे प्रमाण वाढले होते. यामध्ये बहुसंख्य ग्रामस्थ जखमी झाले होते. तसेच मृत पावले आहेत. गतीरोधक नाही तसेच काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने हे अपघात होत असल्याने खड्डे बुजवा व गतिरोधक बसवा ही मागणी ढवण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. या मागणीला यश आल्याने जनतेतून आनंद व्यक्त केला जात असून याबद्दल ढवण यांनी जो पाठपुरावा केला त्याबद्दल जनतेने त्यांना धन्यवाद दिले आहेत. शनिवार दि. ३ रोजी सकाळी ११ वाजता ढवण यांनी या रस्त्याची पाहणी केली असून यावेळी ग्रामस्थ कोंडीभाऊ ढवळे, विजय कोल्हे, कैलास कवाद, महिंद्रा पांढरकर ,दत्तात्रय लंके , विकास वरखडे, गुलाब काळे, किरण गायकवाड,संतोष लामखडे आदी यावेळी उपस्थित होते.