सिन्नरचे अजय बाहेती ठरले राेटरी आयडाॅलचे विजेते राज्यातील १५ स्पर्धकांतून झाली निवड

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने प्रथमच राज्यस्तरीय रोटरी आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत १५ स्पर्धकांमधून रोटरी क्लब ऑफ सिन्नरचे अजय बाहेती प्रथम क्रमांक पटकावला असून पहिले रोटरी आयडॉल ठरले आहेत.
एरवी सामाजिक, शैक्षणिक, कृषी, शिक्षण, ग्रामविकास अशा विविध उपक्रमांत अग्रेसर असलेल्या राेटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने उपक्रम घेतले जातात. राेटरी डिस्ट्रीक्ट ३०३० च्या कार्यरत रोटरी सदस्यांची ओळख व्हावी तसेच राेटरी क्लबच्या उपक्रमांचा प्रचार व प्रचार व्हावा या उद्देशाने या राेटरी आयडाॅल स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात ऑनलाईन झालेल्या या स्पर्धेसाठी ४५ राेटरीयन सहभागी झाले हाेते. यात निवड झालेल्या १५ स्पर्धकांची निवड अंतिम ग्रँड फिनालेसाठी झाली. काल रविवारी संध्याकाळी शहरातील इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या सभागृहात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
स्पर्धेच्या झालेल्या अंतिम फेरीत १५ स्पर्धंकांमधून राेटरी क्लब ऑफ सिन्नरचे अजय बाहेती हे पहिले राेटरी आयडाॅल ठरले. अंतिम फेरीसाठी नाशिकसह जळगाव, अकाेला, अमरावती, नागपूर, भद्रावती, चंद्रपूर, चाेपडासह विविध ठिकाणांहून राेटरीयन सहभागी झाले हाेते. या स्पर्धेच्या माध्यमातून राेटरी क्लबच्या सदस्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत बाहेती हे विजयी झाले. रोटरीचे प्रांतपाल आनंद झुनझुनवाला यांच्या हस्ते विजेत्यांना राेख रक्कम, सन्मानचिन्ह आणि पारिताेषिक देवून गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राेटरीचे माजी अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, राेटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष सीए प्रफुल्ल बराडीया, सचिव ओमप्रकाश रावत, शिल्पा पारख उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून रागिणी कामतीकर आणि नमिता राजहंस यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी काठीयावाड आणि सोनी गिफ्ट यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास मकरंद चिंधडे, अनुजा चौगुले, विनीत कोटावार यांच्यासह राेटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित हाेते. सूत्रसंचालन दमयंती बरडिया आणि डॉ. हितेश बुरुड यांनी केले.
—
विजेते पुढीलप्रमाणे –
प्रथम – अजय बाहेती, राेटरी क्लब ऑफ सिन्नर
पहिले उपविजेते – डाॅ. राजेश पाटील, राेटरी क्लब जळगाव वेस्ट
दुसरे उपविजेते – श्रीकांत मानकर, अमरावती
उत्तेजनार्थ – शिवकुमार डागा, राेटरी क्लब ऑफ खामगाव
डाॅ. अमित प्रेमचंद्र, राेटरी क्लब ऑफ भद्रावती
–