जनशक्ती विकास आघाडीचे ज्ञानेश्वर कारखान्याला निवेदन
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
ऊसतोडीमधील पक्षपातीपणा व अन्यायी धोरण बाजूला ठेऊन ज्ञानेश्वर स.साखर कारखाना प्रशासनाने कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस येत्या ८-१० दिवसात तोडून न्यावा अन्यथा जनशक्ती विकास आघाडी याबाबत कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात मोठी भूमिका घेईल असे निवेदन जनशक्तीचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी ज्ञानेश्वर सह.साखर कारखाना भेंडा चे कार्यकारी संचालक श्री.अनिल शेवाळे यांना दिले
. यावेळी जनशक्ती उद्योग आघाडीचे अध्यक्ष अशोकराव ढाकणे, अकबर शेख, रघुनाथ सातपुते, नवनाथ साबळे, कॉ.राम पोटफोडे, भाऊसाहेब बोडखे, गोरख भोसले, काकासाहेब बोडखे, शामराव ठोंबरे, आबासाहेब बोडखे, शिवाजीराव डावरे, वसंत बोडखे, भागचंद कुंडकर, लक्ष्मण घोंगडे आदि कार्यकर्ते व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हंटले आहे की, तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे आपल्या शेतातील ऊस कसा तोडला जाईल ही चिंता पडली आहे. काही शेतकऱ्यांना ०५ ते १० हजार देऊन ऊस तोडावा लागला. असे असूनही काही शेतकऱ्यांचा ऊस अद्यापपर्यंत कारखाना प्रशासनाने तोडलेला नाही.
मागील वर्षी पाऊस जरी मोठ्या प्रमाणात झाला असला तरी फेब्रुवारी पासूनच पाण्याची पातळी कमी होत गेल्याने सध्या अनेक ठिकाणच्या विहिरी कोरड्या पडलेल्या आहे. अनेक शेतकऱ्यांचा पाण्याअभावी ऊस जळून चाललेला आहे. आता तर पैसे देऊनही ऊस पेटवून देऊन तोडण्याची पद्धत सध्या सुरु आहे. यामध्ये शेतकऱ्यांची पाईपलाईन, ठिबक आदि सिंचन साधने जळून जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसानही होत आहे, परंतु नाईलाजाने हताश होऊन शेतकरी याकडे पाहत आहे.
ज्ञानेश्वर कारखान्याचा काही कर्मचारी वर्ग केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन ऊस तोडणीमध्ये पक्षपातीपणा करीत आहे. जे शेतकरी स्वाभिमानी भूमिकेत आहेत अगर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या राजकीय विचाराला साथ देत नाही अशा शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक हेळसांड सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. जे शेतकरी कारखान्याच्या राजकीय विचाराचे कार्यकर्ते आहेत अशांचा कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडला जातो तर काहीं शेतकऱ्यांची १-२ एकरची नोंद असूनही त्यांचा ७-८ एकर ऊस तोडून नेला जातो. हा प्रकार केवळ अन्याय करणारा नसून निर्दयी, जुलमी आणि सत्तेचा माज असलेला आहे.
शेतकरीच कारखान्याचा मालक आहे असे मोठ्या थाटात कारखान्याकडून सांगितले जाते मात्र कर्मचारी याच्याविरुद्ध कृती करत असून हा पक्षपातीपणा तातडीने बंद करावा. असे न झाल्यास शेतकऱ्यांमध्ये मोठा उद्रेक होऊन शेतकरी कोणत्याही स्वरूपाची टोकाची भूमिका व्यवस्थापना विरुद्ध घेऊ शकतात. त्यामुळे येत्या ८-१० दिवसात कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस तोडून न्यावा. अन्यथा जनशक्ती विकास आघाडी कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या विरोधात भूमिका घेईल असा इशारा निवेदना द्वारे दिला आहे