राजूर च्या देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न

.विलास तुपे
राजूर : सत्यनिकेतन संचालित ॲड.एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर येथे निवडणूक साक्षरता मंडळ, विद्यार्थी कल्याण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम अकोले चे तहसीलदार मा. सतीश थिटे, प्रा.डॉ.नितिन आरोटे, राजुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक सरोदे यांचे प्रमुख उपस्थितीत दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी संपन्न झाला
.
आपल्या प्रमुख भाषणात तहसीलदार थिटे म्हणाले की, ” मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून राष्ट्र उभारणीत युवकांनी आपले योगदान द्यावे, मतदार जागृती मुळे भारतीय लोकशाही बळकट होऊ शकेल, विवेकपूर्ण मतदार हाच लोकशाहीचा खरा आधार आहे ” असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
” पैसे घेऊन मतदान करणे म्हणजे आपल्या देशाशी बेईमानी करणे असे आहे, मतदार हा भारतीय लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे, त्यामुळे योग्य विचार करून मतदान करावे. त्यामुळे भारतीय राजकारण निकोप राहील.” असे प्रतिपादन राज्यशास्त्र विषयाचे अभ्यासक व व्याख्याते प्रा.डॉ.नितीन आरोटे यांनी केले.
तर ” युवकांनी चारित्र्य जपावे, व देशाला चांगले नेतृत्व देण्यासाठी विचारपूर्वक मतदान करून निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, युवक हाच देशाचा खरा आधार आहे ” असे मत पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक सरोदे यांनी व्यक्त केले.

उपस्थित सर्व मान्यवरांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यगीताने व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवडणूक साक्षरता मंडळाचे समन्वयक डॉ. आर.आर. सोनवणे यांनी केले, डॉ. गंधारे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आभार प्रदर्शन डॉ. गिते यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी श्री एस. टी.येलमामे सर, साळवे साहेब, गोसावी साहेब, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद,विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.