इतर

प्रशासनातील समन्वयासाठी अॅप तयार करा- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि.१५ – शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा राज्यात आघाडीवर असला पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने एक अॅप विकसित करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

राहाता तहसील कार्यालयात आयोजित शासकीय विभागांचा कामकाज आढावा बैठकीत श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती सुनंदा नरवाडे, तहसीलदार अमोल मोरे आदी उपस्थित होते.

श्री.विखे पाटील म्हणाले, जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठ्याच्या तालुक्यात २९ योजना मंजूर असून यातील हस्तांतरित केलेल्या योजनांचे ग्रामपंचायत ठराव घेण्यात यावे. अधीक्षक अभियंता यांनी तालुक्यातील जीवन प्राधिकरण योजनांचा स्वतंत्र आढावा घ्यावा.

प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी ‘रूफ स्टॉप सोलर’ बसविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्यात यावी. मागेल त्याला सोलर योजनेत तालुक्यातील उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. तालुक्यात मंजूर नवीन वीज उपकेंद्रांची तात्काळ पूर्ण करण्यात यावी.

धरण कालव्यातील सर्व चाऱ्या दुरूस्त करण्यात येवून त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे. चाऱ्यालगत असलेले सेवा रस्ते दुरुस्त करण्यात यावे. शिर्डी व राहाता नगरपरिषदेने जलसंपदा विभागाची थकलेली पाणीपट्टी वनटाइम सेटलमेंट करून तात्काळ भरावी.

कृषी विभागाच्या एक रूपयात पीक विमा, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान, शेतकरी अपघात विमा‌‌, फळबाग लागवड योजनांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या उत्पादनास बाजारपेठ मिळावी, यासाठी कृषी विभागाने क्लस्टर विकसित करावेत, अशा सूचना श्री. विखे पाटील यांनी यावेळी केल्या.

आरोग्य विभागाचा आढावा घेतांना ते म्हणाले की, तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रात पुरेशा औषधसाठा व यंत्रसामुग्री सुरळीत सुरू आहेत याची खात्री करावी. रूग्णालयामध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्यात यावे. रूग्णवाहिका कार्यरत असल्याची खात्री करावी.

शिर्डी महसूल भवनचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे. त्याठिकाणी सुसज्ज असे वातानुकूलित बैठक सभागृह उभारण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात यावी. प्रत्येक विभागाने १०० दिवसाच्या कार्यक्रमात नमूद सात कलमी कार्यक्रमांची पूर्तता करण्यात यावी, सर्व कार्यालयांची स्वच्छता करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button