इतर

हरिश्चंद्रगडावर खोल दरीत सापडले, दोन पर्यटकांचे सांगाडे

अकोले प्रतिनिधी


हरिश्चंद्र गडाच्या कोकणकड्यावर बुधवारी (दि. ११)
संध्याकाळी दोन तरुणांचे सांगाडे सापडले आहे. दोन्ही तरुणांची ओळख राजूर आणि टोकावडे (ता. मुरबाड, जि. ठाणे) पोलिसांना पटली आहे.

पुढील तपास टोकावडे पोलिसांकडे दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजूर पोलीस स्टेशन मध्ये जून महिन्यामध्ये रोहित साळुंके (रा. सिलवासा) हा तरुण हरिश्चंद्रगडावर बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्याच्या कुटूंबाकडून दाखल करण्यात
आली होती. सदर बेपत्ता तरुणाचा शोध घेत असतानाच मान्सून दाखल झाल्याने राजूर पोलिसांना तपास थांबवावा लागला होता.

राजूर पोलिसांनी लोणावळा येथील ऍडव्हेंचर ट्रेकर ग्रुपच्या मदतीने सदर तपास सुरू केला होता. पावसाळा संपल्यानंतर राजूर पोलिसांनी पुन्हा एकदा तपासाला गती देत रोहित साळुंके याचा तपास हरिश्चंद्रगडावर लोणावळ्यातील ट्रेकर ग्रुपच्या मदतीने सुरू केला.

बुधवारी (दि. ११) सदर ग्रुप हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्याजवळील १८०० फुट खोल दरीमध्ये उतरला असता, त्यांना दोन तरुणांचे सांगाडे आढळून आले. त्यामध्ये
एका सांगाड्याजवळ लातूर येथील गणेश होनराव याचे आधारकार्ड व पॅनकार्ड आढळून आले. तर याच सांगाड्यापासून २५ फुटावर आणखी एक सांगाडा आढळन आला. तर दुसरा सांगाडा रोहित साळुंके याचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रोहित साळुंके याने आत्महत्या कशी करावी, याविषयी युट्युबवर
सर्च करून आत्महत्या केली असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.

तर गणेश होनराव याने सहा ते सात महिन्यापूर्वी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. सदर सांगाड्यांचा शोध राजूर पोलिसांनी लावला असून पुढील तपास टोकावडे पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. लोणावळ्यातील ऍडव्हेंचर ट्रेकर्स
ग्रुपचे गणेश गीर यांच्या अधिपत्याखाली हेमंत जाधव, आशिष गुंजाळ, ओम उगले व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी या शोध मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता.

हरिश्चंद्रगडाच्या परिसरामध्ये कोकणकड्याच्या परिसरामध्ये खोलवर दऱ्या असून अनेक ठिकाणी वनविभागाने संरक्षक जाळ्या लावणे गरजेचे असून
भंडारदरा परिसरातील धोकादायक ठिकाणी वनविभागाने लक्ष टाकुन संरक्षक जाळ्या लावाव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे. राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी अतिशय जबाबदारीने आपले कामगिरी पार पाडत रोहित साळुंके युवकाचा तपास करताना आणखी
एका तरुणाचा तपास लावल्याने परिसरातून
राजूर पोलीस स्टेशनवर कौतुकाचा वर्षाव
होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button