अगस्ती च्या स्वयंपूर्ण ते साठी किसान सभेचा ७ कलमी प्रस्ताव सादर
अकोले। प्रतिनिधी
अगस्ती साखर कारखाना स्वयंपूर्ण व्हावा या अपेक्षेने सभासदांनी शेतकरी समृद्धी मंडळाला एकहाती सत्ता दिली. निवडणुकीत शेतकरी समृद्धी मंडळाने अगस्ती कर्जमुक्त व्हावा यासाठी सचोटीने कारभार करण्याचे आश्वासन दिले होते. निवडून आलेल्या संचालक मंडळाने या दृष्टीने कारभार सुरु केला असून कारखान्याच्या संचालक मंडळाला शेतकरी समृद्धी मंडळातील सहभागी पक्षाचे प्रतिनिधी संपूर्ण सहकार्य करत आहेत.
समृद्धी मंडळातील आठ पक्षांच्या प्रतिनिधींचा अगस्ती कारखान्याच्या कारभारात सकारात्मक सहभाग असावा यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ. डॉ. किरण लहामटे तसेच अगस्तीचे चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ यांच्या सोबत समृद्धी मंडळातील पक्षांच्या प्रतिनिधींच्या नियमित बैठका घेण्याचे ठरविण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे यानुसार पहिली बैठक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न झाली होती.
कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांनीही सहकार्य सुरु केले आहे. व्ही.एस.आय.च्या तज्ञांना अगस्ती कारखान्यावर पाठवून त्यांनी अगस्ती कारखान्याबाबत प्राथमिक तुलनात्मक टिपण तयार केले आहे. सदरच्या टिपणाच्या प्रकाशात कारखाना सक्षम करण्याकडे वाटचाल करण्यासाठी किसान सभेने ७ कलमी प्रस्ताव तयार केला आहे. किसान सभेच्या वतीने तो अगस्तीचे चेअरमन श्री. सीतारामपाटील गायकर यांना सादर करण्यात आला आहे. सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावातील मुद्यांच्या आधारे अगस्ती स्वयंपूर्ण करण्याच्या प्रक्रियेत अगस्तीवर प्रेम करणाऱ्या तमाम सर्वांनी सहभागी व्हावे व अगस्ती कारखाना स्वयंपूर्ण करणे हे एक जनआंदोलन बनावे या दृष्टीने हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
उस उपलब्धता, उस बेणे, उसाची खरेदी किंमत, मनुष्यबळ, वेतन व मजुरीवरील खर्च, कन्व्हर्जन कॉस्ट, फॅक्टरी ओव्हरहेड, उपपदार्थ निर्मिती या ७ मुद्यांच्या आधारे हा प्रस्ताव बनविण्यात आला आहे.
अगस्ती स्वयंपूर्ण व्हावा यासाठी सर्वांनीच चिकाटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. व्ही.एस.आय.ने तयार केलेले टिपण अधिक व्यापकपणे चर्चेला यावे व यातून कार्यक्षेत्रातील सभासदांच्या असलेल्या अपेक्षा फलद्रूप व्हाव्यात यासाठी हि सुरुवात करण्यात आली आहे.
अगस्ती स्वयंपूर्ण होण्याची चर्चा पुढे जावी व यातून ठोस कृती व्हावी यासाठी व्ही.एस.आय.च्या तज्ञांबरोबर शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करावी अशी मागणीही किसान सभे चे .डॉ. अजित नवले ,सदाशिव साबळे ,नामदेव भांगरे ,एकनाथ मेंगाळ ,प्रकाश साबळे
सुरेश भोर ,ज्ञानेश्वर काकड यांनी केली आहे