मंगळवारी अकोल्यात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन.
अकोले /प्रतिनिधी
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अकोले येथील पंचायत समिती सभागृह येथे मंगळवार दिनांक 27/ 12/ 22 रोजी सकाळी 11वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्राहकपंचायत चे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी दिली.
या मेळाव्यात ग्राहकांच्या विविध क्षेत्रातील तक्रारींचे निवारण करण्यात ग्राहक पंचायत अकोले पुढाकार घेणार असून संबंधित अधिकारी व ग्राहक यांच्यासमोर समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर व जिल्हा सहसचिव रमेश राक्षे यांनी स्पष्ट केले.
अकोले तालुक्यात ग्राहक दिनी यापूर्वी अनेक ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अकोले हा आदिवासी व डोंगराळ तालुका आहे. तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहेत. अनेक शासकीय दाखले, रेशन पुरवठा,वीज पुरवठा, विज बिले, शहरी व ग्रामीण भागात गॅस पुरवठा, शेतकऱ्यांसाठी बी बियाणे, कृषी खाते, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुविधा ,शिष्यवृत्ती, आदिवासी आश्रम शाळांमध्ये मिळणारी दर्जाहीन सुविधा, भूमि अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, सेतू ,आधार ,वनखाते, पंचायत समिती व कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग ,शिक्षण विभाग ,पोलीस प्रशासन, प्रकल्प कार्यालय राजुर, बाल विकास प्रकल्प ,ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामसेवक, एसटी ,सार्वजनिक बांधकाम ,बँका ,जीवन प्राधिकरण, वैद्यमापनशास्त्र ,कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर खात्यांच्या तक्रारीचे निराकरण या मेळाव्यात करण्यात येणार आहे.