उरण येथील फुंडे हायस्कूल येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

हेमंत देशमुख
उरण /रायगड जिल्हा
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील फुंडे हायस्कूल येथे राष्ट्रीय ग्राहक दिन आज साजरा करण्यात आला
रयत शिक्षण संस्थेचे, तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय, फुंडे येथे कर्मवीर भाऊराव पाटील करिअर क्लबच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी ग्राहकांच्या समस्या आणि ग्राहक संरक्षणाची गरज या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री संतोष पवार (उरण सामाजिक संस्था सचिव) हे उपस्थित होते. त्याचबरोबर विद्यालयाचे ओ.एस. श्री तुमडे सर, ज्युनिअर कॉलेज प्रमुख श्री कुटे सर, श्री तोरणे सर उपस्थित होते. श्री तुमडे सर यांच्या हस्ते श्री संतोष पवार यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व करियर क्लब स्थापने मागची भूमिका करिअर क्लबचे समुपदेशक प्रा. दिनेश सासवडे यांनी मांडली.
श्री संतोष पवार यांनी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत विस्तारलेली बाजारपेठ व या बाजारपेठेतील राजा ग्राहक याचे होणारे शोषण, फसवणूक, त्याच्यावरील अन्याय याबाबत उदाहरणांचे दाखले देऊन ग्राहक म्हणून कसे फसवले जाते याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच ग्राहक पंचायतीची स्थापना ग्राहक संरक्षण कायदा, त्यातील तरतुदी, तक्रार निवारण यंत्रणा, लोक अदालत, जनहित याचिका याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ऑनलाइन व्यवहारातील धोके व ग्राहकांची सतर्कता याविषयी विद्यार्थ्यांशी प्रश्न रूपाने संवाद साधत वस्तू सेवांची खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या अभ्यासकेंद्राची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी विद्यार्थिनी कु. पूजा मुढे हिने ग्राहकांच्या समस्या व ग्राहकाचे अज्ञान यामुळे होणारी फसवणूक याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार श्री कुटे सर यांनी मानले.
