इतर

राज्यस्तरीय पारनेर साहित्यरत्न पुरस्कार डॉ.सौ. गुंफा कोकाटे यांना जाहीर

दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर साहित्य साधना मंच व टीम आडवाटेचं पारनेर यांच्या वतीने दरवर्षी कै रावसाहेब (अण्णा) ठुबे यांच्या समरणार्थ देण्यात येणा-या साहित्यरत्न पुरस्कारासाठी यावर्षी बेलापूर महाविद्यालयाच्या प्राचार्या व ज्येष्ठ कवयित्री डॉ. गुंफा कोकाटे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे.
प्रतिवर्षीप्रमाणे 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त होणाऱ्या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा व पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
डॉ. गुंफा कोकाटे या मूळ गाव पारनेर तालुक्यातील पळशी असून, अत्यंत सर्वसामान्य गरीब कुटुंबातून त्यांनी संघर्षमय वाटचाल करत शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात उत्कर्ष साधला आहे. डॉ. गुंफाताई या बालपणापासून नियमित अभ्यासात प्रगल्भ तसेच वक्तृत्व व काव्यलेखन वाचन स्पर्धांमध्ये गुणवंत विद्यार्थिनी राहिल्या आहेत.
आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी शेकडो राज्यस्तरीय वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश मिळवलेले आहे. अत्यंत गरीब परिस्थितीमधून शिक्षण सुरु असल्याने महिन्यातून किमान 1-2 वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या तर वह्या पुस्तकांचा खर्च भागायचा, अशा प्रकारे परीस्थीतीने शिकवलेल्या या धड्यामुळे त्यांचे लेखन व वक्तृत्व अधिकाधिक बहरत गेले असावे.
गुंफताईंना याआधी विद्यारत्न पुरस्कार, काव्यसरिता पुरस्कार, शिवांजली पुरस्कार, पद्मा मोरजे पुरस्कार, शब्दसृष्टी पुरस्कार, शांता शेळके पुरस्कार, सावित्रीबाई फुले उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार, जिजाऊ स्त्री सन्मान पुरस्कार, कर्मयोगिनी पुरस्कार, साहित्य जीवनगौरव, विश्वदुर्गा पुरस्कार , आदर्श प्राचार्य पुरस्कार असे शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात 25 हून अधिक पुरस्कार प्राप्त आहेत.
त्यांचे रानभरारी, मी सूर्याच्या कुळाची, वादळांना झेलताना, ओवीगीतांचे स्वरूप, वांझोटे वार, कविता तुझ्या माझ्या , इ. साहित्य प्रकाशित असून “मी जिंकत गेले आयुष्य” हे बहुचर्चित पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
गुंफाताई अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा राहिलेल्या असून विविध वाहिन्या, दूरदर्शन व आकाशवाणी केंद्रावर विविध मुलाखती, व्याख्याने तसेच विविध नाटिका व शॉर्टफिल्म मध्ये त्यांनी मध्यवर्ती भूमिका साकारलेल्या आहेत.
सध्या गुंफताई कला व वाणिज्य महाविद्यालय, बेलापूर येथे प्राचार्या म्हणून कार्यरत असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभागात एम.फील , पीएच.डी च्या मार्गदर्शिका म्हणून प्रमुख भूमिका बजावत आहेत.
श्रीरामपूर, पारनेर तालुका व अहमदनगर जिल्हा पातळीवर विविध साहित्य मंडळे, काव्यमंच व प्रकाशन संस्थांच्या त्या सक्रिय सदस्या असून विविध संस्थांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदे त्यांनी भूषवली आहेत.
पारनेर तालुक्याच्या साहित्य चळवळीत त्यांचे योगदान मोलाचे आहे.
सालाबादप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी 3 जानेवारी 2023 रोजी पारनेर महाविद्यालयात दिमाखदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते डॉ. गुंफाताई कोकाटे यांना कै. रावसाहेब अण्णा ठुबे यांच्या स्मरणार्थ पारनेर साहित्य साधना मंचाच्या राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे . यानिमित्त राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून, राज्यभरातील नवोदित व जेष्ठ कवी- कवयित्रींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा आणि या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन पारनेर साहित्य साधना मंच, टीम आडवाटेचं पारनेर व पारनेर महाविद्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button