भारतीय राज्यघटना ही जगातील आदर्श – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

अमृत उद्योग समूहात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
संगमनेर ( प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे सर्वांना समानतेसह स्वातंत्र्य व विविध मूलभूत अधिकार मिळाले आहेत. ही राज्यघटना जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात आदर्श राज्यघटना असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहण प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हा. चेअरमन संतोष हासे, रामहरी कातोरे, डॉ. तुषार दिघे, रोहिदास पवार, ॲड.अशोक हजारे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर , सेक्रेटरी किरण कानवडे, रामदास तांबडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख विविध शाळांचे मुख्याध्यापक कार्यकर्ते पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले की, प्रजासत्ताक दिन हा मोठा महत्त्वाचा असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली. या राज्यघटनेमुळे प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य ,संचार स्वातंत्र्य याचबरोबर समानतेचे स्वातंत्र्य मिळाले आहे. राज्यघटनेमुळे बदलाचा अधिकार असून सरकार बदलण्याचा अधिकार सुद्धा सामान्य नागरिकाला आहे. राज्यघटनेमध्ये देशाचे हित, सीमांचे रक्षण, देशाची प्रगती, प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकाराचे रक्षण व्हावे याची तत्त्व सांगितले आहे.

भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात आदर्श राज्यघटना असून ती चिरायू राहिली पाहिजे. ही राज्यघटना अधिक सामर्थ्यवान होण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे तसेच राज्यघटनेतील मूलभूत तत्वांना धक्का लागणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.
संगमनेरच्या सहकार हा देशात लौकिकास्पद ठरला असून अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्था शैक्षणिक संस्था यांनी चांगल्या कामगिरीतून गौरव मिळवला आहे. ही वाटचाल आपल्या सर्वांना कायम ठेवायची असून संगमनेरचे सुसंस्कृत राजकारण, विकास कामे ,समृद्ध अर्थव्यवस्था जपण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहावे असे सांगताना कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांना राज्य पातळीवरचा उत्कृष्ट कार्यकारी संचालक मिळालेला पुरस्कार हा चांगल्या कामाचा असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सुरक्षा अधिकारी मोहन मस्के, महेश मस्के ,बाळासाहेब दातखिळे यांच्या नेतृत्वाखाली विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट परेड संचालन करून मानवंदना दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले. यावेळी कारखान्याचे विविध विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी यांच्यासह पालक , शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी संचालक घुगरकर यांचा सत्कार
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट कार्यकारी संचालक म्हणून थोरात कारखान्याचे जगन्नाथ घुगरकर यांना पुणे येथे पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार सामूहिक असून यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते जगन्नाथ घुगरकर यांचा सत्कार करण्यात आला.