पुढील २५- ३० वर्षे मीच आमदार ! आ. नीलेश लंके यांचा दावा

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
गेल्या अडीच वर्षात राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून पारनेर-नगर मतदारसंघात मोठया प्रमाणात विकास कामे मार्गी लावली. आता सरकार नसले तरी विकास कामांना निधी कमी पडणार नाही. आपले सरकार नसले तरी मी आमदार आहे. कोणाच्या मनात काही असेल की सरकार बदलले तसे काही होणार नाही. असे सांगतानाच पुढील पंचविस, तिस वर्षे मतदारसंघाचा आमदार मीच असेल असा दावा आ. लंके यांनी केला.
गणेशोत्सव तसेच वनकुटेचे लोकनियुक्त सरपंच अॅड. राहुल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कारण्यात आलेल्या कार्यक्रमात आ. लंके हे बोलत होते. ते म्हणाले, सरकार नसले तरी मतदारसंघातील विकास प्रक्रिया थांबणार नाही. दुर्गम असलेल्या वनकुटे गावासाठी आतापर्यंत तब्बल २५ कोटींचा निधी देण्यात आला. पाणी योजनेसाठीही लवकरच निधी उपलब्ध होईल. आदीवासी बांधवांनाही विकास प्रक्रियेत सामाऊन घेता आले याचेही समाधान आहे. के के रेंजचे संकट आले त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संरक्षण मंत्र्यांकडून हा निर्णय फिरवून घेतला. दुसरीकडे काही मंडळी आता हा निर्णय बदलला जाणार नाही, न्यायालयात जाऊन आपण जमीनींचा जास्त मोबदला मिळवू असे सांगत आपल्या बांधवांकडून अर्ज भरून घेत होते. ज्यावेळी हा निर्णय बाहेर आला त्याच वेळी एक इंचही जमीन के के रेंजला जाऊ देणार नाही. तशी वेळ आली तर रणगाडयापुढे मी झोपेल अशी ग्वाही आपण दिली होती. शरद पवार यांनी या प्रश्नात लक्ष घातले आणि हे संकट दुर झाले. यापुढील काळातही मतदारसंघामधील कोणावरही संकट आले तर ते दुर करण्यासाठी मी लोकप्रतिनिधी या नात्याने पुढे असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी कोमल पाटोळे मेंढापूरकर यांच्या पारंपारीक गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या या कार्यक्रमास परिसरातून चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी पाटोळे यांचा आंब्याचे रोप देऊन अॅड. राहूल झावरे यांनी सत्कार केला. तर धनगर बांधवांनी पारंपारीक घोंगडी, फेटा, काठी देउन आ. लंके यांचा सन्मान केला. अॅड. राहूल झावरे व अॅड. स्नेहा झावरे यांच्या हस्ते नीलेश लंके प्रतिष्ठाणला शालेय साहित्याची भेट देण्यात आली. यावेळी बा ठ झावरे, भागुजी झावरे, अर्जुन भालेकर, जि. प. सदस्य धनंजय गाडे, दिपक लंके, अप्पासाहेब शिंदे, श्रीकांत डेरे, राजू रोडे, बाबासाहेब सासवडे, जगदीश गागरे, बाळराजे दळवी, आरबाज पठाण, सुभाष शिंदे, श्रीकांत चौरे, सुखदेव चितळकर, गणेश हाके यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता
अॅड. राहुल यांच्या वाढदिवसाचे लवकरच गिफ्ट
सरपंच राहूल झावरे यांचा वाढदिवस शिक्षक दिनी व गणपतीमध्ये आला आहे. झावरे हे भाग्यवान आहेत. झावरे यांनी वनकुटे व परिसराच्या विकासासाठी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळेच अडीच वर्षात २५ कोटींचा निधी तुमच्या गावात आला. लवकरच झावरे यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट वनकुटे ग्रामस्थांना देणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.