जलजीवनच्या पाणी योजनांसाठीही सोलर पंपांचा वापर करावा – काशिनाथ दाते

दत्ता ठुबे
पारनेर : प्रतिनिधी
सध्या तालुक्यात अनेक गावांमध्ये जल जीवन मिशन अभियानांतर्गत पाणी योजनांची कामे सुरू असून या योजनांच्या अंदाजपत्रकात सोलर पंपाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी केली.
पारनेर तालुक्यातील म्हसोबा झाप व नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावांच्या पाणी योजनांना दाते हे बांधकाम व कृषी समितीचे सभापती असताना सोलर पंपांसाठी निधीची तरतूद केली होती. दोन्ही ठिकाणी सोलर पंप सक्षपणे काम करीत असून ग्रामपंचायतीस वीेज बीलांचा खर्च येत नाही. या दोन्ही ठिकाणच्या योजना यशस्वी झाल्यानंतर दाते यांनी तालुक्यातील पोखरी व खडकवाडी पाणी योजनांसाठीही जिल्हा परीषदेच्या सेसमधून निधी उपलब्ध केला आहे. लवकरच या योजना सोलर पंपावर कार्यान्वीत होणार आहेत.
यासंदर्भात बोलताना दाते यांनी सांगितले की, जल जीवन मिशन अभियानांतर्गत तालुक्यातील अनेक गावांत कोटयावधी रूपये खर्चाच्या पाणी योजनांची कामे सुरू आहेत. या योजना पुर्णत्वास गेल्यानंतर वीज पंपांची बीले भरण्याची जबाबदार ग्रामपंचायतींवर येऊन पडणार आहे. ग्रामपंचायतींच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे ही बीले भरताना संबंधित ग्रामपंचायतीचे कंबरडे मोडणार आहे. ते टाळण्यासाठी सोलर पंपांची तरतूद योजनेच्या अंदाजपत्रकात करण्यात आल्यास ग्रामपंचायतीस मोठा दिलासा मिळणार आहे. वीजेचा खर्च नसल्याने भविष्यात पाणी योजना वीज बीलाअभावी बंद होण्याची शक्यताही नाही.
सोलर पंपावर पाणी योजना सक्षपणे चालत असल्याचे दिसून आले असून यासंदर्भात आपण संबंधितांशी चर्चा करून जल जीवन योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंदाजपत्रकात सोलर पंपाचा समावेश करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे दाते यांनी सांगितले
.