जगात आत्मविश्वासाची शिदोरी म्हणजे आई- .पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शेटे

पारनेर -नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालयात “आई माझ्या महाविद्यालयात” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाशिक येथे कार्यरत व निघोज येथील मुलगी आणि सून असलेल्या पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शेटे , रांजणगाव गणपती येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सविता काळे व पोलीस उपनिरीक्षक चित्रा घोडे , पत्रकार सौ . निलम खोसे पाटील उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शेटे म्हणाल्या की , आजच्या या स्पर्धेच्या धक्का धक्कीच्या , स्पर्धेच्या जगात आत्मविश्वासाची शिदोरी म्हणजे आई होय . मुलींनी आपले ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावेत. स्पर्धा परीक्षेकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये अपार क्षमता असून, त्या कोणतेही ध्येय गाठू शकतात. फक्त योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन प्रियंका शेटे यांनी केले .

पोलीस उपनिरीक्षक सविता काळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मुलींनी स्वतःमध्ये बदल घडवणे गरजेचे आहे. आपल्या आयुष्याचे नियंत्रण सोशल मीडिया किंवा अन्य व्यसनांऐवजी योग्य दिशेने ठेवणे आवश्यक आहे. आपले कुटुंब आणि समाजाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत.
पोलीस उपनिरीक्षक चित्रा घोडे यांनी स्वतःच्या जीवनातील संघर्षमय प्रवास उलगडून सांगितला. त्या म्हणाल्या, प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात, परंतु योग्य विचारसरणी आणि सकारात्मक ऊर्जा यांच्या जोरावर कोणतीही अडचण दूर करता येते. मेहनतीला पर्याय नाही आणि यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. असे ही घोडे म्हणाल्या .
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर म्हणाले की , विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा, वाचन कक्षाचा आणि अनुभवी प्राध्यापक वर्गाचा योग्य उपयोग करून स्वतःला घडवावे. अधिकाधिक ज्ञान मिळवून आपल्या भविष्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत , त्यांच्यासाठी उज्ज्वल संधी उपलब्ध आहेत.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित माता भारावून गेल्या. उपस्थित मान्यवर व आईंना विविध झाडांची रोपे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, काही मातांनी आणि विद्यार्थिनींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपली मते व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांची पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी वर निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ . सहदेव आहेर यांच्या हस्ते शाल , फुलांचा गुच्छ , एक रोपटे देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनीषा गाडीलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नीलिमा घुले यांनी केले, तर प्रा. अमृता दौंडकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिका , विद्यार्थिनी व त्यांच्या आई मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.