मुक्त विद्यापीठात आजपासून रायला महोत्सव

१०० विद्यार्थी होणार सहभागी
नाशिक : ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठात ‘रायला महोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव शुक्रवार दि. 1 ते 3 मार्च दरम्यान तीन दिवस चालणार आहे. विशेष म्हणजे या महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील 2 आश्रम शाळांतील तब्बल 100 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
या महोत्सवाचे उदघाटन शुक्रवारी (दि.1) रोजी सायंकाळी 6 वाजता मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते आणि डॉ. विजयलक्ष्मी मनेरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी अतिथी म्हणून मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके, विद्यापीठाचे नियोजन अधिकारी डॉ. राम ठकार, रोटरी क्लबचे सचिव डॉ. गौरव सामनेरकर, हेमराज राजपूत आणि रायला महोत्सवाच्या चेअरमन सुरेखा राजपूत उपस्थित राहणार आहेत. रोटारीच्या डिस्ट्रिक्ट ३०३० च्या प्रांतपाल रोटे आशा वेणुगोपाल ह्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे मंगेश अपशंकर हे असतील.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भारताची धावपटू सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हीची मुलाखत लेखक संतोष साबळे हे घेणार आहेत. तसेच सर्वश्री अनिरुद्ध अथणी, ॲड. मनीष चिंधडे, पराग जोशी, सागर भदाणे, डॉ. मदनुरकर, निवेदिता पोतदार, डॉ. अक्षता आणि डॉ. हितेश बुरड, कवी प्रशांत केंदळे यांच्या कविता, अभिनेते शरद उगले, सोनाली चिंधडे, डॉ. हितेश बुरड तसेच अन्न हेच पूर्ण ब्रम्ह या विषयावर आदिश्री पगार, श्रद्धा वाळवेकर हे वक्ते निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांना ताऱ्यांचे बेट हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. याशिवाय बुद्धीप्रेरक खेळ, कॅम्प फायर, झुम्बाही घेण्यात येणार आहे. उर्मिला देवधर यांच्या वतीने उत्कृष्ट रायला विद्यार्थी विद्यार्थिनींना पुरस्कार देण्यात येणार आहे. इंजि. अविनाश शिरोडे यांच्यावतीने या विद्यार्थ्यांना तारांगण शो दाखविण्यात येईल. या रायला महोत्सवाचा समारोप रविवारी दुपारी 3 मार्चला दुपारी 12 वाजता होईल.