डॉ. भरत शेणकर यांना मॉरीशस मध्ये ‘सहोदरी रत्न’ सन्मान

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
मॉरीशस मध्ये दिनांक १० व ११ जानेवारी रोजी पार पडलेल्या अंतरराष्ट्रीय अधिवेशनात राजूर येथील ॲड्. मनोहरराव नानासाहेब देशमुख महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. भरत शेणकर यांना ‘सहोदरी रत्न’ या सन्मानाने गौरविण्यात आले.
‘भाषा सहोदरी हिंदी (न्यास)’, नवी दिल्ली व मॉरीशस स्थित ‘महात्मा गांधी संस्थान’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या अंतराष्ट्रीय अधिवेशनात मॉरीशस चे प्रसिद्ध साहित्यकार श्री. रामदेव धुरंधर यांच्या शुभ हस्ते हा सम्मान डॉ. शेणकर यांना देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉरीशस चे राष्ट्रपती महामहीम पृथ्वीराज सिंह रुपन हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते झाले.
या अधिवेशनासाठी भारतातून ११५ प्रतिनिधी हजर होते. या प्रसंगी ‘सहोदरी पत्रिके’ चे विमोचन राष्ट्रपतींच्या शुभहस्ते झाले. या अधिवेशनात डॉ. भरत शेणकर यांनी ‘प्रवासी साहित्यकारों का हिन्दी के अंतर्राष्ट्रीयकरण में ‘योगदान’ या विषयावर आपल्या शोध निबंधाचे वाचन केले.
प्रा. भरत शेणकर हे हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसार करणाऱ्या विविध संस्थाचे आजीवन सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आपल्या साहित्यिक व शैक्षणिक योगदानाबद्दल डॉ. शेणकर यांना हिंदी सेवी सम्मान, राष्ट्रभाषा सम्मान, गंगा गौरव पुरस्कार, राष्ट्रीय साहित्य सेवा सम्मान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप सम्मान, महात्मा फुले फेलोशिप सम्मान आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. डॉ. शेणकर सध्या विश्व हिंदी साहित्य सेवा संस्थान, प्रयागराज चे महाराष्ट्र प्रभारी म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. शेणकर यांना मॉरीशस मध्ये प्राप्त झालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड्. मनोहरराव नानासाहेब देशमुख, सचिव मा. टी.एन. कानवडे, सह सचिव मा. मिलिंद उमराणी, सत्यनिकेतन संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख, प्रध्यापक वृंद, सेवक वर्ग, विद्यार्थी, राजूरचे ग्रामस्थ तसेच विश्व हिंदी साहित्य सेवा संस्थान, प्रयागराज चे अध्यक्ष डॉ. शहाबुद्दीन नियाज मुहम्मद शेख व सचिव डॉ. गोकुलेश्वर कुमार द्विवेदी यांनी अभिनंदन केले आहे.