दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:
तालुक्यातील पळवे खुर्द गावात यंदा नाम फाउंडेशन टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत पळवे खुर्द व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची दोन तलावातील गाळ काढण्याचे तसेच गावातील ओढे खोलीकरण व रुंदीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. यंदा हवामान खात्याकडून भरपूर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्याप्रमाणे पळवे खुर्द येथे सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने गावातील सर्व तलाव तसेच ओढे या मध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे.
यावेळी तलाव व ओढा खोलीकरण रुंदीकरण झाल्याने वाहून जाणारे पाणी हे पूर्णपणे साठले असून ह्याचा शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे.गावामध्ये पाणीप्रश्न बिकट होऊन टँकर सुरू असतानाच पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिण्याचा पाणीप्रश्न सुटून शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. यंदा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस सर्वत्र दमदार पडल्याने शेतकरीवर्गात खरिपाची पेरणी वेळेवर होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.
नाम फाउंडेशन टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत पळवे खुर्द यांनी केलेल्या कामाची निसर्गाने पावती दिल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांची आहे. पळवे खुर्द हे गाव फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नाम फाउंडेशन व लोकसहभागातून झालेल्या कामामुळे पाणीसाठा वाढला असून शेतकरी तसेच ग्रामपंचायत पळवे खुर्द यांनी नाम फाउंडेशनचे आभार मानले.