नाशिक रोटरी क्लब ने केला सेवेच्या पुजाऱ्यांचा आगळावेगळा सन्मान!

जगण्याचा आनंद सेवेतूनच – चंद्रकांत पुलकुंडवार
नाशिक : सेवा ही वृत्ती असून सेवेतूनच माणूस खरा व्यक्त होतो. स्वतःसह समाजाचा विकास कसा साधता येईल यासाठी प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी समाजाने संघटीत होणे गरजेचे आहे. जगण्याचा आनंद सेवेतून व्यक्त होतो. सेवा ही माणसाला माणुसपणासह जवळ आणते असे प्रतिपादन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने सामाजिक जीवनात प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर सन्मानाने जीवन जगणारे उल्लेखनीय कार्य करणारे पाणीपुरी विक्रेते दिव्यांग किशोर आणि मनीषा कंडेकर, बोटाला शारीरिक व्यंग असतानादेखील ४५ वर्षांपासून चर्म व्यवसाय करणारे चंद्रकांत गुजरे, अमरधाममध्ये मृताच्या नातेवाईकांना मदत करणारे राजेंद्र राईजडे आणि जिल्हा रुग्णालयात गेल्या ३४ वर्षांपासून रुग्ण तसेच प्रसूती झालेल्या महिलांना प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी आणि आहार व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या नर्स सुजाता शिरसाठ यांना नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते ‘रोटरी सेवा पुरस्कार २०२३’ (व्होकेशनल अवार्ड) देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे मनोनीत प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, रोटरीचे अध्यक्ष प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत, व्होकेशनल अवार्ड समितीचे अध्यक्ष संदीप खंडेलवार उपस्थित होते.
ज्ञानेश्वर शेवाळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रफुल बरडिया यांनी प्रास्ताविक केले. मकरंद चिंधडे आणि गौरी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. अक्षिता बुरुड आणि प्रणव गाडगीळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास नाशिकककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिव ओमप्रकाश रावत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
……………………..