संगमनेर – पारनेर तालुक्यात मोठी एमआयडीसी करावी – सत्यजित तांबे यांची विधानपरिषदेत मागणी

संगमनेर प्रतिनिधी
सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला संगमनेर व पारनेर तालुका हा पर्जन्य छायेतील तालुका आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवसांच्या कामांमधून तालुक्यात विकास साधला आहे. मुंबई – नाशिक – पुणे या गोल्डन ट्रँगल वर असलेल्या संगमनेर व पारनेर तालुक्यामध्ये नव्याने मोठी एमआयडीसी उभारावी अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा हा विस्ताराने मोठा आहे. संगमनेर व पारनेर तालुके हे दुष्काळी तालुके आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात मागील 35 – 40 वर्षांमध्ये सततच्या विकास कामांमधून मोठे परिवर्तन झाले आहे, गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या आहेत, याचबरोबर निळवंडे धरण व कालव्यांबरोबर सिंचनाची सुविधा निर्माण केली आहे. सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास,कृषी या क्षेत्रांमध्ये संगमनेर तालुका हा राज्याला दिशादर्शक ठरणार आहे.
राज्य सरकारने डावोस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेमध्ये 15 लाख 70 हजार कोटींचा विविध उद्योजकांबरोबर करार केला आहे. त्यामुळे अनेक नवीन उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत.
संगमनेर व पारनेर तालुका हे दुष्काळी तालुके आहेत. याचबरोबर मुंबई नाशिक व पुणे या गोल्डन ट्रँगल मध्ये संगमनेर आहे. याचबरोबर नाशिक पुणे महामार्ग, नव्याने प्रस्तावित झालेल्या सुरत महामार्ग, नाशिक पुणे रेल्वे,काकडी विमानतळ या सर्व जमेच्या बाजू आहेत. पारनेर मधील टाकळी ढोकेश्वर व संगमनेर तालुक्याच्या साकुर पठारातील दुष्काळी भागामध्ये हजारो जमीन एमआयडीसीसाठी उपलब्ध होऊ शकते. यामुळे या परिसरातील तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळू शकते.
त्यामुळे डावोस येथे झालेल्या करारानुसार संगमनेर व पारनेर तालुक्याच्या सरहद्दीवर साकुर व टाकळी ढोकेश्वर परिसरातील पठारावर भव्य व मोठी एमआयडीसी निर्माण करावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे
राज्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते दहावीसाठी शिष्यवृत्ती दिली जाते मात्र 2017- 18 पासून या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. तरी सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून राज्य सरकारने तातडीने सर्व ओबीसी विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्यांचे शिष्यवृत्ती जमा करावी अशी मागणी ही आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.