रुग्ण हक्क परिषद , उतरणार राज्यातील निवडणुकांच्या आखाड्यात !

परिषदेकडून लवकरच होणार भूमिका जाहीर!
दत्ता ठुबे
मुंबई – डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आय एस ओ मानांकित आशिया खंडातील पहिली संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद भारतात प्रसिद्ध आहे. रुग्णांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कायदेशीर सनदशीर व संवैधानिक मार्गाने लढत राहण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष सामान्य रुग्णांना दिलासा देण्याचे काम रुग्ण हक्क परिषदेने केले आहे.
रुग्ण हक्क परिषदेने कसबा विधानसभा पोट निवडणुकीमध्ये आपला उमेदवारही दिला होता, मात्र वेळेत शपथ पत्र दाखल न करता आल्यामुळे रुग्ण हक्क परिषदेच्या राजकीय आखाड्यात उतरलेल्या अपर्णा साठे- मारणे यांचा अर्ज बाद झाला. मात्र रुग्ण हक्क परिषदेने राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी आता बैठकीचे आयोजन केले आहे.
शहर व जिल्हा कमिटीवर काम करणाऱ्या रुग्ण हक्क परिषदेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला व कार्यकर्त्याला निवडणूक लढविणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती आता पुढे येत आहे.
रुग्णांच्या हक्काला प्राधान्य दिले पाहिजे आणि सर्वच रुग्णांना लाखो रुपयांचे उपचार मोफतच मिळाले पाहिजेत, यासाठी फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा निर्माण झाला पाहिजे म्हणून रस्त्यावरची लढाई लढताना आता राजकीय लढाई सुद्धा लढण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, म्हणूनच येत्या रविवारी 12 फेब्रुवारी 2023 रोजी दांडेकर पूल, राष्ट्रसेवा दल, साने गुरुजी स्मारक येथे हक्क परिषदेच्या पदाधिकारी कार्यकर्ते सोबतच विविध संस्था आणि संघटनांच्या राजकीय भूमिका घेऊ इच्छिणाऱ्या पदाधिकाऱ्यांना या खुल्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक होणार आहे.
आता परिषदेच्या या महत्त्वपूर्ण खुल्या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल नेमका काय निर्णय घेतला जातोय याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

रुग्ण हक्क परिषद आणि इतर सामाजिक संघटना व संस्थांच्या माध्यमातून एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणे.
फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा झाला पाहिजे, यासाठी आंदोलनाची दिशा ठरवणे.
रुग्णांना मिळणाऱ्या शासकीय निधी व योजना बाबत.
तसेच सर्व जिल्ह्यांच्या कमेट्या बदलणे व नवीन पदाधिकारी नियुक्त करणे. या बाबत चर्चा होणार आहे