४० हजाराची लाच मागणारा महावितरणचा विधी अधिकारी गजाआड
पुणे : नवीन इमारतीमधील विजेच्या मीटरबाबत जागा मालकाने घेतलेल्या हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणारा महावितरणचा (MSEB) विधी सल्लागार व सहायक विधी अधिकारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
विधी सल्लागार सत्यजीत विक्रम पवार Satyajit Vikram Pawar (रास्ता पेठ महावितरण कार्यालय) आणि विधी अधिकारी समीर रामनाथ चव्हाण (गणेशखिंड महावितरण कार्यालय) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
लोकांची वेगवेगळ्या प्रकारे अडवणूक करुन लाच मागितली जाते. पण, अशा प्रकारे अनुकूल अहवाल देण्यासाठी लाच घेतली जात असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकार्यांना माहिती नव्हते. अशा प्रकारे अनुकूल अहवाल देण्यासाठी लाच घेताना करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पिंपरी गावातील जमीन मालक व बांधकाम व्यावसायिक यांचा करार होऊन त्यानुसार बांधकाम व्यावसायिकाने नवीन इमारत बांधली. या दरम्यान, जागा मालक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात या इमारतीतील गाळे देण्या घेण्यावरुन आर्थिक वाद झाला. बांधकाम व्यावसायिकाने या नवीन इमारतीत विजेचे मीटर्स देण्यासाठी महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. त्यापैकी ११ मीटर्सला जागा मालकाने हरकत घेतली. त्यात कायदेशीर बाब आल्याने हा हरकत अर्ज गणेशखिंड रोडवरील सहायक विधी अधिकारी समीर चव्हाण याच्याकडे गेला. त्यांनी तो सल्ल्यासाठी रास्ता पेठ कार्यालयातील विधी सल्लागार सत्यजीत पवार याच्याकडे पाठविला.
दोघांनी तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाला अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली.
त्यांनी तक्रार दिल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याची १८ व १९ जानेवारी रोजी पडताळणी केली.
त्यात दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर मंगळवारी महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयात सापळा रचण्यात आला.
तक्रारदाराकडून ४० हजार रुपये घेताना दोघांना पकडण्यात आले.
समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली
ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.
या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
.