बेजबाबदार आरोग्य मंत्री तानाजी सावंत राजीनामा द्या – उमेश चव्हाण, अध्यक्ष -रुग्ण हक्क परिषद

पुणे – पुण्यात पोटनिवडणुकीचा बाजार बघायला मिळाला. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने केंद्रातील मंत्री, राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह सगळेच नेते पुढारी पुण्यात मुक्कामी ठाण मांडून बसले होते. मात्र याच निवडणुकीच्या काळात पुण्यात एडोणा व्हायरसने थैमान घातले आहे. प्रत्येकाच्या घरातील लहान मुले या एडोना व्हायरसने आजारी पडलेली दिसतात. वय वर्ष एक ते दहा या वयोगटातल्या सर्व मुलांना एडोना व्हायरस या संसर्गजन्य आजाराने ग्रासले आहे. यामध्ये खाल्लेला अन्नाचा कण देखील मुलांना पचत नाही. जोरात पिचकारी मारल्या सारखे पाण्यासारखे जुलाब बालकांना होतात. सडकून ताप येतो. पहिली ते चौथी या वर्गात शिकणाऱ्या सर्वच मुलांना अशा पद्धतीचा संसर्ग झालेला बघायला मिळत असताना, राज्य सरकारकडून याबद्दल किमान एक साधी पत्रकार परिषद तर जाऊद्या परंतु किमान या रोगाची काळजी कशी घ्यावी याबद्दल साधी नोटिफिकेशन काढलेली सुद्धा दिसत नाही. ही अत्यंत बेफिकरी दर्शवणारी बेजबाबदार आणि निंदाव्य
जनक बाब आहे. चिमुकल्या लहान मुलांच्या नाजूक आरोग्याचा प्रश्न उद्भवलेला असताना, त्या भयंकर साथीच्या एडोना व्हायरस कडे जाणीवपूर्वक बेजबाबदारपणे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आज रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पुण्यात बोलताना केली.
उमेश चव्हाण पुढे म्हणाले की, वय वर्ष एक ते दहा या वयोगटात म्हणजेच पहिली ते चौथी मध्ये शिकणाऱ्या मुलांना या एडोना व्हायरस आजाराने लक्ष केलेले आहे. हा रोग संसर्गजन्य आहे. दहा मधील आठ मुलांना याची लागण झालेली दिसते. उलट्या जुलाब आणि भयंकर तापाने ही लहानगी मुले ग्रस्त असताना या आजाराबद्दल राज्य सरकारकडून चकार शब्द काढला जात नाही. काय काळजी घ्यावी? याबद्दल कुठे उपाययोजना होतील? यासाठी सरकार काय करत आहे? स्थानिक महापालिका आरोग्य प्रशासनाला काय सूचना दिल्या पाहिजेत? याबद्दल बेजबाबदार असलेले आरोग्य मंत्री तानाजी सावंत काही बोलायला तयार नाहीत.
मुळात खेकड्यांनी धरण फोडले आणि हपकिन संस्थेला हपकिन माणूस असे म्हणणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत मी किती गरीब होतो आणि महाविद्यालयीन काळात किती हुशार होतो म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतात, मात्र लहान लहान नाजूक बालकांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झालेला असताना त्यावर सरकार म्हणून कुठलीही उपायोजना करत नाहीत, म्हणूनच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे, तानाजी सावंत यांना आरोग्य मंत्री पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, हक्क नाही.
तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा म्हणून त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार- दरम्यान तानाजी सावंत यांनी आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामाच दिला पाहिजे, या मागणीसाठी शेकडो लहान बालकांना घेऊन शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता तानाजी सावंत यांच्या सातारा रोड जवळील घरासमोर रुग्ण हक्क परिषद पुणे शहर व पुणे जिल्हा कमिटी तीव्र लक्षवेधी धरणे आंदोलन करणार असल्याचेही उमेश चव्हाण म्हणाले. या आंदोलनाला जास्तीत जास्त लहान बालकांना घेऊन त्यांच्या पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन देखील उमेश चव्हाण यांनी केले.