पुणे अंधजन मंडळींच्या मागण्या मान्य; उपोषणाला रुग्ण हक्क परिषदेचा सक्रिय पाठिंबा!!

दत्ता ठुबे
पुणे – राष्ट्रीय दृष्टिहीन संघ आणि पुणे अंदजन मंडळ या संस्थांच्या वतीने पुणे महानगरपालिकेसमोर गेले तीन दिवस आमरण उपोषण सुरू होते. पुणे अंधजन मंडळाचे अनिल खुराणा, पल्लवी भालशंकर यांनी यावेळी उपोषण करत, आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनामध्ये रुग्ण हक्क परिषदेने सक्रिय पाठिंबा दिला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, अंध व्यक्तीला मोफत बस प्रवास असला तरी त्याच्या सोबत असणाऱ्या गाईडला 50 टक्के बस तिकीट दराने रक्कम आकारली जाते. आणि रद्द करून अंध व्यक्तीबरोबर असणाऱ्या गाईडला सुद्धा मोफत बस प्रवास मिळाला पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोफत अंध व्यक्तींना पुणे महानगरपालिके अंतर्गत घरे मिळावीत. इतर अपंग दिव्यांग बंधूंना ज्या पद्धतीने कुबडी, तीन चाकी सायकल, व्हीलचेयर दिली जाते त्याचप्रमाणे अंध व्यक्तींना सुद्धा गॉगल- चष्मे, व्यावसायिक कामासाठी मोबाईल -लॅपटॉप, पथारी हातगाडी व्यवसायासाठीचे लायसन्स, पुणे महानगरपालिकेने बांधलेले व्यावसायिक गाळे अंध व्यक्तींना मिळाले पाहिजे, तसेच संजय गांधी पेन्शन योजनेचा लाभ देखील अंध व्यक्तींना मिळाला पाहिजे या अंध व्यक्तींच्या प्रमुख मागण्या आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासमोर मांडण्यात आल्या. अति. आयुक्त कुणाल खेमनार यांनी शिष्टमंडळाशी अर्धातास चर्चा करून सर्वच मागण्या मान्य करत असल्याचे आश्वासन देत, उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
पुणे अंधजन मंडळ व दृष्टिहीन संघाचे अनिल खुराना म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबला. आमच्या पत्र व्यवहाराला शासन स्तरावर किंमत दिली जात नाही म्हणून आंदोलन करणे आम्हाला गरजेचे वाटले. रुग्ण हक्क परिषद ही संघटना आमच्या सोबत आल्यामुळे आमची ताकद वाढली.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, अंधसंस्थेचे पल्लवी भालशंकर, अनिल खुराना, रुग्ण हक्क परिषदेचे जिल्हा अध्यक्ष दीपक खेंडकर, शहराध्यक्ष अपर्णा साठ्ये – मारणे, उपशहराध्यक्ष यशवंत भोसले, लक्ष्मण थोरात यांचेसह शेकडो अंधबांधव उपस्थित होते.
महापालिकेने आश्वासन दिल्याप्रमाणे पुढील आठ दिवसात अंमलबजावणी केली नाही तर पुन्हा बेमुदत आंदोलन व आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिला.