देशात आणि राज्यात हुकूमशाहीचे वारे-उमेश चव्हाण

दत्ता ठुबे
पुणे :- देशात आणि राज्यात हुकूमशाहीचे वारे वाहत आहे. कोणी विरोधात बोललं की त्याला ईडीची नोटीस दाखवली जाते. भारतीय जनता पार्टीत आला की भ्रष्टाचाराचे आरोप माफ होतात. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये राहिलं की भ्रष्टाचाराचेच काय निर्लज्जपणे देशद्रोहाचे सुद्धा आरोप केले जातात. मात्र कितीही टोकाचे आरोप झाले आणि तरीसुद्धा माणूस भाजपमध्ये आला की, तो एकदम शुद्ध होऊन जातो, असं असलं तरी इथपर्यंत लोकांनी तितकं लक्ष दिलं नव्हतं मात्र शिवसेना फोडली, शिवसेनेचे दोन तुकडे केले, शिवसेनेच्या पाठीत 40 गद्दारांनी खंजीर खुपसला हे महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात पटलं नाही. महाराष्ट्रामध्ये असं घाणेरडे राजकारण कधीच नव्हतं, अशी चर्चा लोकांमध्ये गेले आठ महिने सुरु होती. चाळीस गद्दारांना धडा शिकवण्याचे आणि त्यांच्या थोबाडावर सणसणीत चपराक ओढण्याचे काम कसब्यातील मतदार राजाने केलं आहे, अशी प्रतिक्रिया रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली.
महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. लोकांना व्यवसाय करायला भांडवल राहिले नाही. तरुण मुलं शिकलीयेत त्यांच्या हाताला काम नाही. नोकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय. पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठलाय. भयंकर वाहतूक कोंडी झालीये. तरी भारतीय जनता पार्टीचे लोक वारंवार रेटून खोटं बोलतात. राज्यस्तरावरील एमपीएससीचा प्रश्न असो की एसटीतल्या कामगारांच्या आंदोलनाचा प्रश्न असो भारतीय जनता पार्टीशी संलग्न असलेले लोक प्रचंड खोटे बोलतात. अशा खोटारडे पणाच्या राजकारणाला जनता अक्षरश: वैतागलेली होती. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला मात्र पराकोटीचे नीच पातळीचे घाणेरडे राजकारण करण्यामध्ये भाजपा नेहमीच पुढे राहिली, जनतेच्या डोक्यावर वरवंटा फिरवून गुवाहाटीची ट्रिप करत 50 खोके घेऊन केलेल्या 40 गद्दारांना मतदारांनी आज सणसणीत चपराक लगावली आहे. असे म्हणत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी नवनिर्वाचित निवडून आलेले आमदार रवींद्र धंगेकर व काँग्रेससह महाविकास आघाडीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.