इतर

कर्तबगार व्यक्तिमत्व : सुरेशराव कोते


     मन सुद्ध तुझं
    गोष्ट हाये पृथिवी मोलाची ..
    तू चाल पुढं
    तुला रं गड्या भीति कशाची ?
    पर्वा बी कुणाची ?
       
     विख्यात गीतकार शांताराम आठवलेंचे हे एका चित्रपटातील गीत अनेकांना ज्ञात आहे . मनाला बळ देणाऱ्या या ओळी जगात थोडक्या – मोजक्या माणसांना नक्कीच भरीव प्रेरणा देणाऱ्या अन् लबाड लुच्च्या विश्वातही उभारी देणाऱ्या !

    शून्यातून विश्व घडविणारी काही माणसं काळाच्या प्रतिकूल स्थितीवर पाय घट्ट रोवून कर्तबगारी सिद्ध करतात . प्रसंगी अविरत संघर्ष करुन कमालीच्या शांत – संयमी स्वभावाने पुढे जाताना यशाची वेगवेगळी क्षेत्र काबीज करतात . अकोले तालुक्यातील कोतूळ या छोट्याशा खेड्यातून आयुष्यातील धडपडीचा श्रीगणेशा करणारे सुरेशनाना कोते हे असेच दातृत्वशील – निगर्वी रसायन म्हणावे लागेल !

     पंधरा – वीस वर्षांपूर्वी कोतूळ जवळील वाघापूर येथील आऊबाई देवस्थान घाट परिसरात अकोले अगस्ती महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे ( एन् .एस् . एस् . ) शिबीर घेतले गेले त्यावेळी मला आठ – दहा दिवस तेथे मुक्कामाचा योग आला होता . येथला निसर्गाचे वरदान लाभलेला घाटातील परिसर आणि देवस्थानचे पालटलेले रुप पाहून देवस्थानशी संबंधित लेख मी ( कोते नानांच्या उल्लेखासह ) तेंव्हा वर्तमानपत्रात लिहिला होता . सुरेश कोतेंचा आणि माझा थेट असा परिचय नव्हता तेंव्हा . या देवस्थान साठी त्यांनी भरघोस सहकार्य केल्याची माहिती मिळाली होती . हा लेख त्यांच्या वाचनात आल्यावर आवर्जून दखल घेऊन नानांनी संपर्क साधल्याची आठवण आहे .

     कोतूळच्या या भूमीपुत्राने आपल्या साधेपणा , शांत – मितभाषी , संयत – स्नेहशील स्वभावाने केवळ राज्यातीलच नव्हे तर राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली . चाहता वर्ग जमविला . ‘ श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड समूह ‘ ही जगातील सर्वात मोठी संस्था अशी प्रभावी ओळख असलेल्या उद्योग क्षेत्रात देशभरात ५० हजार महिला काम करतात . महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेला ६० वर्षे पूर्ण झालीत . अशा विख्यात संस्थेशी कार्यकारी अधिकारी या नात्याने जोडले गेलेले सुरेश कोते हे कर्तबगार व्यक्तित्व . आपल्या स्पृहणीय कार्याचा प्रभावी ठसा उमटवून कोते यांनी संपादन केलेला विश्वास त्यांच्या असामान्य नेतृत्वगुणांची साक्ष देणारा आहे .

    राष्ट्रपतींच्या हस्ते समाजसेवेचा , महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते कर्तव्यम् प्रेरणा तसेच 2022 चा सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कारासह अन्य लक्षवेधी पुरस्कार वेळोवेळी कोते नानांना प्राप्त झाले आहेत .
    अगस्ती आश्रम देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त , अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे स्वीकृत विश्वस्त , वाघापूर आऊबाई देवस्थान , अभिनव शिक्षण संस्था यांसह विविध क्षेत्रातील तोलामोलाच्या संस्थांवरील सन्मानाच्या पदांनी सुरेश कोते यांचे कार्यक्षेत्र व्यापले आहे . सामाजिक , शैक्षणिक , उद्योजकता क्षेत्राशी निगडीत कार्याचा विस्तारित व्याप सांभाळताना – अनुभवताना आजवरच्या वाटचालीत कधीही या माणसाला अहंकाराचा वारा मनाला स्पर्शू शकला नाही की अभिमान – पदांची , मोठेपणाची लालसा त्यांना वाटली नाही . मातब्बरी वाटली नाही . आजपर्यंतच्या प्रदीर्घ कालावधीत मोठ्या प्रमाणात दानशूरपणाचा त्यांनी अक्षरशः मुक्त हस्ते मनमोकळेपणा अनेक ठिकाणी दाखवला आहे . एक सालस – सुसंस्कृत व्यक्तित्व म्हणून नानांचा परिचय सर्वदूर पोचला आहे .

    विकासाधारित कोणत्याही कार्यक्षेत्राशी संबंधित सुरेश कोते यांचा संकल्पित आराखडा तसेच अपेक्षित यशाचा master plan तयार असतो .. तशी त्यांची तयारी असते . कटूता न आणण्याचा आटोकाट प्रयत्न करुन कार्यक्षेत्रात मनस्वी स्वभावाने पावले टाकण्याची त्यांची ख्याती आहे . रागरुसवा नसतो . द्वेष मत्सर – हेवादावा नसतो . असलीच तर केवळ आणि केवळ समन्वयवादी भूमिका असते . दृष्टिकोन असतो व्यापक . खुद्द कोतूळ मधील विख्यात शिवालय कोतूळेश्वर देवस्थानसह अन्य सामाजिक – सांस्कृतिक विकास कामांसंदर्भात कोते नानांची सकारात्मक आणि कृतीशील विचारधारा सातत्याने प्रगतीस चालना देणारी ठरली आहे . व्यर्थ आक्रमक अथवा फुका मिरवण्याची – मिरवून घ्यायचा नानांचा स्वभाव नाही !

    संयत , मनमिळावू , समंजस स्वभाव , डोळस ध्येय आणि सामंजस्याधारित विचार , समन्वयाला प्राधान्य या सुरेश कोतेंच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वाभाविक पैलूंमुळे त्यांच्या यापुढील काळातील उज्वल भवितव्याची खात्री अधिक पटते .
    मंगेश पाडगावकरांच्या ‘ जिप्सी ‘ कवितेतील अविरत – अथक भटकंतीचा स्रोत अन् आशय सांगणाऱ्या काही ओळी कोते नानांसारख्या जिद्दी – मेहनती , उद्यमशील व्यक्तिमत्वांना निश्चित लागू पडतात –
     चार भिंतींची ‘ जिप्सीला ‘ ओढ राहिली नाही ..
     कुणीतरी साद घाली दूर अनंतामधून .
    एक ‘ जिप्सी ‘ आहे
    माझ्या मनात खोल दडून !

कोते साहेबांना जन्मदिन सदिच्छा ..
    ————————————

    डॉ . सुनील शिंदे
        अकोले / अहमदनगर
     ( 90 75 99 43 32 )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button