सकारात्मकता, संस्कारांतूनच जीवन अर्थपूर्ण – डॉ. आशुतोष रारावीकर

नाशिक : विज्ञानाचे यंत्र, कुशलतेचे तंत्र आणि नैतिकतेचा मंत्र ही जीवनातील प्रगतीसाठीची त्रिसूत्री आहे. सकारात्मकता, संस्कार, समतोल, सहयोग, संयम, सर्वांगीण विकास आणि समर्पण यातूनच जीवन अर्थपूर्ण होते असे प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यिक, अर्थशास्त्रज्ञ तथा भारतीय रिझर्व बँकेत संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे ‘अर्थरंग जीवनाचे’ या विषयावर व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत, नाशिक सीए शाखेचे अध्यक्ष सीए राकेश परदेशी, सचिव सीए जितेंद्र फाफट उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. आशुतोष रारावीकर म्हणाले, जीवनातील तत्वज्ञान अर्थशास्रातील उदाहरणे देवून कवी कुसुमाग्रजांच्या आठवणीही त्यांनी जाग्या केल्या. समृद्धी या विषयावर जीवनाला अनुसरून त्यांनी अनेक उदाहरणे देत जीवनात दातुत्व या विषयाचे महत्वही त्यांनी यावेळी पटवून दिले. वेळ, पैसा आणि शक्ती ही महत्वाची आर्थिक साधने असून त्यांचा विनियोग केल्याने जीवनाला अर्थप्राप्त होतो. धनसत्ता, राजसत्ता, बुद्धीमत्ता आणि नितीमत्ता यांचा संगम राष्ट्राला सुबत्ता देतो. तसेच संपत्तीची योग्य कारणासाठी विनियोग, योग्य कारणासाठी उपभोग आणि अधिकाधिक दानयोग ही जीवनाच्या यशासाठी आदर्श चतुःसूत्री असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले. आपल्या विनोदी खुसखुशीत शैलीत नाशिककरांशी संवाद साधला. तसेच रोटरी क्लब आणि इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी सीए पियुष चांडक, संजीवन तुंबळवाडीकर, ज्येष्ठ संचालक रवी आणि सुचेता महादेवकर, कार्यक्रम समन्वयक शिल्पा पारख, मंथ लीडर वंदना सम्मनवार, हेतल गाला यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते