नाशकात धावणार पिंक रिक्षा

१ एप्रिलपासून नाशिककरांच्या सेवेत
रोटरी स्थापना दिवस उत्साहात साजरा
नाशिक : ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि औद्योगिक पार्श्वभूमी लाभलेल्या नाशिकमध्ये आता पिंक रिक्षा धावणार आहेत. शहरातील दोन गरजू महिलांना पिंक रिक्षांचे वितरण करण्यात आल्याने महिला सक्षमीकरणाला बळकटी मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून या पिंक रिक्षा नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
सामाजिक क्षेत्रात गेल्या ७८ वर्षांपासून कार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नाशिकने महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. १९४५ मध्ये स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिकचा ७८ वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हे औचित्य साधत शहरातील दोन महिला गरजवंतांना रोटरीचे प्रांतपाल डॉ. आनंद झुंजूनूवाला यांच्या हस्ते सौ. नीता सुभाष बागुल आणि सौ. शोभा लक्ष्मण पवार या दोन गरजू महिलांना पिंक रिक्षा वितरित करण्यात आल्या. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रफुल बरडीया, सचिव ओमप्रकाश रावत आदी उपस्थित होते.
पिंक रिक्षा प्रकल्पासाठी रोटरीचे खजिनदार संदीप खंडेलवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पिंक रिक्षा समिती सदस्य सतिष मंडोरा, अड ताथेड, वैशाली रावत, तेजल शाह यांनी महिलांची निवड केली. हा नाशकातील शुभारंभाचा प्रकल्प असून पिंक रिक्षाची सेवा १ एप्रिलपासून नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे. महिलांसाठी महिला चालकांनी चालविलेली रिक्षा नाशिककरांना प्रथमच पाहायला मिळणार आहे. याप्रसंगी मान्यवरांनी महिला रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. रोटरीच्या स्थापना दिवस समारंभात मुख्य अतिथी प्रांतपाल डॉ. आनंद झुंजूनूवाला यांनी रोटरीच्या विविध सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. रोटरी फाउंडेशनतर्फे जगभरात चालविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच पिंक रिक्षाचा उपक्रमास नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली.
यावेळी अध्यक्ष प्रफुल बरडिया यांनी उज्वल दृष्टी अभियाना विषयी माहिती दिली. या अभियाना अंतर्गत सहा हजार विद्यार्थ्यांना मोफत डोळे तपासणी आणि चष्म्यांचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान स्थापना दिवसाचा केक कापून रोटरी सभासदांच्या सुमधुर संगीतसंध्याने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी माजी प्रांतपाल राजेंद्र भामरे, नवनिर्वाचित प्रांतपाल आशा वेणुगोपाल, नाना शेवाळे असिस्टंट गव्हर्नर डॉ. अरुण स्वादी, सलीम बटाडा, माजी अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर आदी मान्यवर तसेच रोटरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिव ओमप्रकाश रावत यांनी आभार मानले. कार्यक्रम समन्वयक शिल्पा पारख, वंदना सम्मनवार, हेतल गाला, सुचेता महादेवकर यांनी कार्यक्रम आयोजनासाठी परिश्रम घेतले.
फोटो ओळ: रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे गरजू महिलांना पिंक रिक्षाचे वितरण करताना प्रांतपाल डॉ. आनंद झुंजुनूवाला. समवेत नवनिर्वाचित प्रांतपाल आशा वेणुगोपाल, रोटरीचे अध्यक्ष प्रफुल बरडीया, महिला लाभार्थी सौ. नीता सुभाष बागुल आणि सौ. शोभा लक्ष्मण पवार आदी.