डॉ. ज्ञानवत्सल स्वामी ५ एप्रिलला नाशकात ६ हजार मुलांना देणार मोफत चष्मे

दृष्टीबाधितांच्या मदतनिधीसाठी रोटरीचा पुढाकार
नाशिक : शहरातील विविध शाळांतल्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करून त्यांना उत्तम दर्जाचे चष्मे देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने पुढाकार दिला आहे. सुमारे ६ हजार मुलांना चष्म्यांचे वाटप करण्यात येणार असून या उपक्रमाच्या मदतनिधीसाठी येत्या बुधवारी दि. ५ एप्रिल रोजी बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे प्रेरक प्रख्याते डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांना ऐकण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.
कोरोना काळात तब्बल दोन वर्षे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न शासन, पालक आणि विद्यार्थ्यासमोर उभा ठाकल्यानंतर मुलांना अभ्यासासाठी मोबाईलशिवाय पर्याय राहिला नव्हता. याशिवाय मुलांत आजकाल भ्रमणध्वनीच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या विकार (अंधुक दिसणे, नीट वाचता न येणे, फळ्यावर लिहिलेले न दिसणे किंवा अस्पष्ट दिसणे) वाढीस लागले आहेत. यासाठी डॉक्टरकडे जाऊन नेत्रतपासणी करून अगदी साधा चष्मा घेणेसुद्धा सामान्यांना न परवडणारे आहे. यामुळे अनेक शाळांतील असंख्य विद्यार्थी दृष्टीबाधित झाले असून ते चष्म्यांपासून वंचित आहेत. अशा गरजू, होतकरू मुलांना चांगली दृष्टी पुन्हा मिळवून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने ‘उज्वल दृष्टी अभियान’ हा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिक शहरातील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या निधी संकलनासाठी प्रेरक प्रख्याते डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांच्या प्रेरक विचारांची अनुभूती नाशिककरांना मिळावी यासाठी बुधवारी दि. ५ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात ‘गिव टू गेन’ विषयाच्या माध्यमातून ते हिंदीत संवाद साधणार आहेत. प्रवेशिकेसाठी किरण कदम यांच्याशी महाकवी कालिदास कलामंदिर येथे ९९२१९२९९३७ यांच्याशी संपर्क साधता येईल. डॉ. ज्ञानवत्सल स्वामी यांना ऐकण्याचा लाभ जास्तीत जास्त नाशिककरांनी घेऊन ‘उज्ज्वल दृष्टी अभियानात’ आपला सहभाग द्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष सीए प्रफुल बरडीया, सचिव ओमप्रकाश रावत, प्रणव गाडगीळ, विजय दिनानी, जयप्रकाश जातेगावकर, सुधीर जोशी आणि जनसंपर्क संचालक संतोष साबळे आदींनी केले आहे.
………………………………….