पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ३.४० कोटी नफा

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी पारनेर तालुक्यातील पारनेर ग्रामीण पतसंस्थेला सन २०२२ – २०२३ या आर्थिक वर्षात रुपये ३ कोटी ४० लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक, चेअरमन तथा जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर यांनी दिली. संस्थेच्या ठेवी मार्च २०२३ अखेर २०५ कोटी ८६ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेचे खेळते भांडवल २३५ कोटी ३३ लाख आहे. संस्थेचे भागभांडवल ५ कोटी ८५ लाख व इतर निधी १९ कोटी ९६ लाख आहे. संस्थेचे कर्ज वाटप १५६ कोटी ४३ लाख असून बँक शिल्लक रुपये ३ कोटी ६५ लाख व बॅक गुंतवणूक रुपये ६० कोटी १६ लाख आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल रुपये २२२१ कोटींची झालेली आहे. आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये २३ कोटी ८० लाख व कर्जामध्ये २३ कोटी ९४ लाख वाढ झालेली आहे. संस्थेची सन २०२३ ते २०२८ कालावधी करीता संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध पार पडली हे सभासदांनी संस्थेच्या व्यवस्थापनावर दाखविलेल्या विश्वास आहे असे संस्थेचे व्हा.चेअरमन सुरेश बो-हुडे सर यांनी सांगितले.
संस्थेने वीस वर्षांच्या कालावधीत सभासदांच्या विश्वासावर प्रगती केलेली असून सभासदांना घर बांधणे, व्यवसाय, स्थावर मालमत्ता खरेदीसाठी, वाहन खरेदी तसेच गोरगरीब गरजु घटक, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, लघुउद्योग, होतकरू कामगार यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करता यावी यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज वितरण करून आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थेच्या वीस वर्षाच्या कालावधीत पारनेर, जामगाव व कामठे (नवी मुंबई) खडकवाडी, आळेफाटा, सुपा व शिरूर येथे स्वमालिकेच्या प्रशस्त इमारती आहेत. जामगाव, नारायणगाव, आळेफाटा ता. जुन्नर, सुपा, कामोठे (नवी मुंबई), वनकुटे, अहमदनगर, भोसरी, खडकवाडी, मांडवे खुर्द, पळशी व शिरुर अशा १७ शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र अहमदनगर, पुणे, ठाणे व मुंबई आहे. संस्थेमार्फत पारनेर, टाकळी ढोकेश्वर, जामगाव, ढवळपुरी येथे सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. संस्थेची अद्यावत कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग, एसएमएस सुविधांमुळे ग्राहकांना सर्व माहिती तात्काळ मिळत आहे. तसेच संस्थेच्या सर्व शाखांमध्ये महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे अधिकृत वीज बील भरणा केंद्र, ग्राहकांना स्वतःच्या क्यू आर कोड ने पैसे स्वीकारण्याची सोय, आर.टी.जि.एस सुविधा सुरू केली आहे. संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय सक्षम आहे. त्यामुळे संस्थेचे आर्थिक व्यवहार दिवसेंदिवस वाढत असून संस्था प्रगतीपथावर असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी सांगितले.