अकोले खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करावी -यशवंत आभाळे

अकोले प्रतिनिधी-
अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले खरेदी विक्री संघाची निवडणूकिसाठी शेतकरी विकास मंडळाने उमेदवार दिले असून सध्याची खरेदी विक्री संघाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने व राज्यात शिंदे फडणवीस सरकार असल्याने हा संघ उर्जित अवस्थेत आणण्यासाठी विरोधकांनी सदर निवडणूक बिनविरोध करून शेतकरी विकास मंडळाच्या ताब्यात द्यावाअसे आवाहन शेतकरी विकास मंडळाच्या वतीने यशवंत आभाळे यांनी केले.
अकोले तालुक्यातील शेतकर्यांच्या दृष्टीने अकोले तालुका सहकारी खरेदी विक्री संघ ही संस्था महत्वाची आहे परंतु गेली काही वर्षे संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. सध्याची खरेदी विक्री संघाची आर्थिक अवस्था बिकट आहे, त्यामुळे सध्या होऊ घातलेल्या संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीत बिनविरोध संचालक मंडळ निवडून द्यावे.
याबाबत शेतकरी विकास मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करत आहे. अकोले तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून पुन्हा शेती व्यवसायासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध झाल्यास शेती पूरक व्यवसाय व उद्योगांना चालना मिळेल. शेतकरी खर्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी त्याला सहाय्य मिळेल. शेतकर्याचे उत्पादन आणि उत्पन्न यात निश्चितपणे वाढ होईल. त्यामुळे शेतकर्यांच्या दृष्टीने खरेदी विक्री संघाची प्रगती होणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्या राज्यात शिवसेना – भाजप युतीचे सरकार आहे. त्यामुळे खरेदी विक्री संघ सुरु करण्यासाठी सरकारची मदत होईल. आगामी निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांना बिनविरोध निवडून देऊन हा संघ शेतकरी विकास मंडळाच्या ताब्यात द्यावा, शासनाच्या मदतीने तो पुन्हा ऊर्जितावस्थेत येईल, नाही तर विरोधी मंडळाने संघ ताब्यात घेऊन चालवून दाखवावा.असे श्री आभाळे यांनी म्हटले आहे.