भाऊच ठरला भावाचा कर्दनकाळ !

डोक्यात खोरे घालून केला भावाचा खून
अकोले तालुक्यातील घटना
कोतुळ,प्रतिनिधी
जनावरांचा रस्ता अडवल्याचा जाब विचारायला आलेल्या सख्ख्या भावाला मारहाण करत डोक्यात खोऱ्याने वार करून खून केल्याची घटना घडली.
अकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथील गोडेवाडीत ही घटना घडली या प्रकरणी सुरेश लेंभे, राजाराम उर्फ राहुल लेंभे या पिता पुत्रांना अकोले पोलिसांनी गजाआड केले आहे.
मयताची पत्नी सोनाबाई मनोहर लेभें (वय ४०, रा.गोडेवाडी, केळी-कोतुळ) यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १६ एप्रिल रोजी सायंकाळच्यासुमारास शेतातील जनावरे सुरेश लेंभे यांच्या रिकाम्या शेतातून घेऊन जात असताना त्यांनी ‘माझ्या शेतातून जनावरे घेऊन जायचे नाही’, असे म्हणत सोनाबाई यांना शिवीगाळ केली. यानंतर काही वेळाने मनोहर लेंभे हे कामावरून घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार सोनाबाई यांनी सांगितला.
त्यानंतर मनोहर यांनी भाऊ सुरेश याला जनावरांचा रस्ता अडवल्याचा जाब विचारला. जाब विचारल्याचा राग आल्याने सुरेश याने मनोहर यांच्या अंगावर धावून गेला आणि त्यांच्याशी झटापट करत शिवीगाळ केली. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या राजाराम उर्फ राहुल लेंभे याने खोऱ्याने मनोहर लेंभे यांच्या डोक्यात वार केले. यामध्ये मनोहर लेंभे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरेश लेंभे आणि राजाराम उर्फ राहुल लेंभे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलीआहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सुभाष भोये करत आहेत.
—– ——-