शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीला खिंडार ?

मुंबई-राज्यात सहा महिन्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप होऊन शिवसेनेला मोठी खिंडार पडली. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. दरम्यान, आता भाजप पुन्हा आमदारांचा मोठा गट फोडण्याचा तयारीत असल्याची चर्चा आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांचा गट फुटल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. या मागे भाजपचा मास्टर प्लॅन असल्याचे पुढे आले होते. आता भाजप पुन्हा असा एक मास्टर स्ट्रोक देण्याच्या तयारीत असून यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस लक्ष्य असल्याचे बोलले जात आहे. यामुळे राज्यातील राजकारण आता पुन्हा नवे वळण घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, काल मुंबई दौऱ्यानिमित्त अमित शहा यांनी पदाधीऱ्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीतील एका मोठा गटाला सत्तेत घेण्यासाठी चर्चा केली असल्याचे देखील वृत्त आहे.
अमित शहा हे शनिवारी रात्री मुंबईत दाखल झाले. यानंतर त्यांनी पक्षातील काही खास लोकांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फोडण्यासाठी शहा यांनी हालचाली सुरू केल्या असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, अजित पवार महाआघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. त्याचबरोबर अजित पवारांसह राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट फुटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी खुलासा केला होता. यावर यावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, काही झालं कितीही दबाव आला तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. यावर काही लोकांना जायचं आहे, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे, घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावलं जात आहे, असे आमदार दबावाखाली निर्णय घेतात. तो निर्णय त्यांचा असेल तो पक्षाचा निर्णय नसेल असेही पवार म्हणाले होते. प्रकाश आंबेडकर यांनी देखील येत्या १५ दिवसांत राज्यात राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले होते.
या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्याकडून राष्ट्रवादीचा एक गट फोडण्यासाठी प्रयत्न सुरू असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतून फुटणाऱ्या गटात कोण कोण असेल, त्याचे नेतृत्व कोण करेल तसेच त्याला सत्तेतील वाटा कशाप्रकारे देता येईल याची चाचपणी अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान केल्याची माहिती आहे. दरम्यान या संदर्भात अधिकृत माहिती नसली तरी या चर्चांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
- अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द
- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता, परंतु ते अद्याप मुंबईतच आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहे. अजित पवार यांचे अचानक सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.