अमित शहां सोबत राष्ट्रवादीच्या तीन बैठका?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट
मुंबई प्रतिनिधी
🔹गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. एकीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. शरद पवारांच्या राजीनाम्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या अमित शाह यांच्यासोबत तीन बैठका झाल्या असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘काही नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांसोबत बैठकी सुरू आहेत, अशा स्वरूपाच्या बातम्या वर्तमानपत्रात येत असल्याचं आपण सर्वांनी पहिलं आहे. त्या बातम्यांचं कुणी खंडन केलेलं नाही. मी आणखी खोलात जाऊन पत्रकारांना विचारलं, तेव्हा अमित शाहंसोबत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तीन-तीन बैठका झाल्या आहेत, असं कळलं’, असंही ते म्हणाले आहेत.
‘शिंदे सरकारवर सुप्रीम कोर्टातून आघात झाला आहे, निलंबनाच्या खटल्यामध्ये शिंदेंविरोधामध्ये निकाल गेला आणि 16 आमदार निलंबित झाले, तर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लागेल. तो मुख्यमंत्री बाहेरून घ्यायचा का? राष्ट्रवादी काँग्रेसमधून घ्यायचा का? अशा अटकली चालल्या आहेत आणि या सगळ्या जगजाहीर आहेत’, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर राष्ट्रवादीची प्रतिक्रियापृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा राष्ट्रवादीने फेटाळला आहे. पृथ्वीराज चव्हाणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचंही राष्ट्रवादीने म्हंटलं आहे. पत्रकारांनी सांगितलं असं ते ऐकिव माहितीच्या आधारावर बोलत आहेत. राष्ट्रवादीची भाजपसोबत कोणतीही बैठक झालेली नाही. राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीसोबतच आहे. मोदी सरकारच्या विरोधात आहे. अशा बातम्या चुकीच्या आहेत, त्यांना काहीही आधार नाही. भाजपसोबत घरोबा करणार नाही, असं ठामपणे शरद पवारांनी सांगितलं, त्यामुळे याला पूर्णविराम मिळाला आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी स्पष्ट केलं आहे.