अकोल्यात गाव पातळीवरील ग्राम बाल संरक्षण समित्या कार्यान्वित करा- उत्कर्षा रूपवते.
अकोले /प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून अकोले पंचायत समिती येथे आयोजित संयुक्त बैठकीमध्ये तालुका प्रशासनातील सर्व विभागांचे मुख्य अधिकारी व ग्रामसेवक/ सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांवर व मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या घटना बघता तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज असून विशेषतः अक्षय तृतीयाचा मुहूर्त आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये ग्रामीण भागांमधल्या बालविवाहांचे प्रमाण वाढते; या पार्श्वभूमीवर सर्वच प्रशासकीय विभागांनी सतर्क राहून गाव पातळीवरील ” ग्राम बाल संरक्षण समित्या” त्वरित कार्यान्वित कराव्यात अशा सूचना आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
तालुक्यामधील महिलांवरती अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना त्यावर आळा घालण्याची जबाबदारी ही सामूहिक असून सजग नागरिकांनी यासाठी यंत्रणेला सहकार्य करणं गरजेचा आहे. पीडित महिलांपर्यंत मदत पोहोचावी यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांची माहिती यावेळी रुपवते यांनी दिली. या संदर्भात काम करत असताना काही अडचणी आढळल्यास पुढील क्रमांकांवर संपर्क करून मदत मिळू शकते – पोलीस यंत्रणा – ११२, महाराष्ट्र राज्य महिला आयोग हेल्पलाइन नंबर – १५५२०९, चाइल्ड लाइन – १०९८. ही सर्व माहिती सदृश्य भागामध्ये प्रत्येक गावामध्ये, ग्रामपंचायत मध्ये लावण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या
तालुक्याचे तहसीलदार मा. सतीश थिटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सदर बैठकीसाठी अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. भोये , राजुर पोलीस स्टेशनचे निरीक्षक मा. गणेश इंगळे , प्रभारी गट विकास अधिकारी, इतर शासकिय विभागांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व तालुक्यातील ग्राम सेवक मोठया संख्येने उपस्थित होते.