सुप्रियां सुळेंच्या हाती राष्ट्रवादीची सूत्रे ? विजय शिवतारेंनी उसविले राष्ट्रवादीच्या संघर्षाचे धागेदोरे!!

मुंबई–कोणी आमच्या वाटेला आले तर त्यांची मस्ती उतरवण्याची धमक आमच्यात आहे, असे म्हणत अजित दादांनी सकाळला दिलेल्या मुलाखतीत विजय शिवतारे यांच्यावर शरसंधान साधले होते. त्यावर विजय शिवतारेंनी देखील अजित पवारांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ना घर का ना घाट का असे म्हणत अजित पवारांचा पुढचा राज ठाकरे होणार, अशी खोचक टिपण्णी शिवतारेंनी केली.
विजय शिवतारे म्हणाले, अजित पवार यांचे रोखठोक, परखड बोलणे असले तरी त्यांचा पद्धतशीरपणे काटा काढला जात आहे. त्यांना त्यांच्या घरातूनच विरोध आहे. जे शिवसेनेत घडले होते, तेच अजित पवार यांच्या बाबतीत होत आहे. ताकद चांगली असतानाही राज ठाकरेंना डावलून महाबळेश्वरच्या सभेत उद्धव ठाकरे यांना वारस करण्यात आले होते. तसेच अजितदादांचे होणार आहे.
विजय शिवतारे म्हणाले, अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर ढकलण्याचे काम सुरू आहे. शरद पवार म्हणाले होते, माझ्या पक्षातून कोणी जात असेल तर जाऊ दे. दुसऱ्या दिवशी सामनात तसेच रोखठोक छापून आले. अजित पवारांना बदनाम करून पक्षातून ढकलण्यात येत आहे. ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था होईल.
मुलीच्या हातात पक्ष द्यायचाय
विजय शिवतारे म्हणाले, अजित पवारांची पक्षात अडचण होत आहे. शरद पवारांना मुलीच्या हातात पक्ष द्यायचा आहे, त्यासाठी ही डिप्लोमॅसी सुरू आहे. अजित पवार यांनी माज उतरवण्याची भाषा करू नये. स्वतःच्या मुलाला का निवडून आणू शकले नाहीत?, असा सवाल विजय शिवतारे यांनी यावेळी केला.
अजितदादांचे शिवतारेंवर शरसंधान
अजित पवारांनी सकाळच्या मुलाखतीत विजय शिवतारेंवर शरसंधान साधले होते. ते म्हणाले, विजय शिवतारे हे माझी बहीण सुप्रिया सुळे आणि आमचे दैवत शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत होते. पवारसाहेबांची उंची आणि सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतील काम पाहून त्यांच्यावर टीका होणे, मला योग्य वाटत नाही. त्यामुळे कुणाला मस्ती आली तर ती जिरवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, असा इशारा अजित पवार यांनी पुन्हा दिला होता. त्यावर शिवतारे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीतल्या कौटुंबिक संघर्षाचे धागेदोरे उसवून दाखविले आहेत.