संदीप वाकचौरे यांच्या ऐसपैस शिक्षण पुस्तकाचे प्रकाशन

संगमनेर प्रतिनिधी
चपराक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या संदीप वाकचौरे यांच्या शिक्षणावरील ऐसपैस शिक्षण या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले.
संगमनेर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक ज्येष्ठ लेखक सुनील माळी, प्रकाशक घनश्याम पाटील, सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य व पत्रकार प्रकाश टाकळकर ,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोरक्ष मदने ,उपाध्यक्ष गोरक्ष नेहे ,सचिव संजय अहिरे ,ज्येष्ठ पत्रकार शाम तिवारी यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
चपराक प्रकाशनाच्या वतीने शिक्षणासंबंधीची बारा पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्या मालेतील संदीप वाकचौरे यांचे हे चौथे पुस्तक आहे. संदीप वाकचौरे यांचे चपराक प्रकाशाने शिक्षणाचे दिवास्वप्न, शिक्षणाचे पसायदान,पाटी पेन्सिल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकाला माझी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांची प्रस्तावना लाभली आहे. तर पाठराखण सेवानिवृत्त शिक्षण संचालक व बालभारतीचे भाषा विषयाचे माजी अध्यक्ष शिवाजी तांबे यांची लाभले आहे.आज समाजात अनेक समस्या अधिकाधिक बिकट होत चालल्या आहेत. त्यांची तीव्रता रोज माध्यमांतून समोर येत आहे. समस्या आहेत सार्वत्रिक बेशिस्तीच्या, वाढलेल्या हिंसेच्या, मूल्यांच्या अवमूल्यनाच्या, नागरिकत्वाविषयीच्या बेफिकिरीच्या, असंवेदनशीलतेच्या, मानवतेपुढे उभ्या राहिलेल्या अनेकविध प्रश्नचिन्हांच्या अनुषंगाने वेध घेण्यात आला आहे.
बिघडत चाललेल्या सामाजिक स्वास्थ्यामुळे लोक भांबावून गेलेत. शासन काही तात्कालिक उपाय शोधते पण ते पुरे पडताना दिसत नाहीत.अशा सर्व समस्यांचे मूळ आहे बिघडलेल्या शिक्षणाच्या आरोग्यात आहे.समस्यांचा चिकित्सक उहापोह ‘ऐसपैस शिक्षण’ या पुस्तकात करण्यात आला आहे.त्यांचे हे पुस्तक व्यापक जन-उद्बोधनाची भूमिका बजावत आहे. समाजातील समस्यांची मूळे शिक्षण व्यवस्थेत कशी आहेत याचा त्यांनी या पुस्तकात अनेक अंगांनी बेध घेतलाय. ते केवळ समस्यांचा वेध घेऊन थांबत नाहीत तर त्यावर अनेक व्यावहारिक मार्ग सुचवतात.
शिक्षण जीवनाभिमुख कसे करता येईल, त्यामधून कालसुसंगत नागरिकत्वाची घडण कशी होऊ शकते यांसारख्या मुद्द्यांचे जागोजागी सोदाहरण विवेचन केले आहे.समस्यांकडे संवेदनशील दृष्टिकोनातून पाहण्यामुळे त्यांच्या प्रतिपादनात सकारात्मक प्रेरकता आढळते. नवीन शैक्षणिक धोरणातील नावीन्यपूर्ण बदलांमुळे अनेक चांगले बदल घडू लागतील.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप वाकचौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन हे नितीन ओझा यांनी मानले. कार्यक्रमास सेवानिवृत्त संपादक प्राचार्य विठ्ठल शेवाळे किसन हासे, आनंद गायकवाड, सुनील महाले, अमोल मतकर,मंगेश सालपे, सतीश आहेर काशिनाथ गोसावी ,सुशांत पावसे शेखर पानसरे, नीलिमा घाडगे, सोमनाथ काळे, अंकुश बुब, सचिन जंत्रे, धीरज ठाकूर, भारत रेघाटे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.